पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारताचे शिक्षणमंत्री झालेले न्यायमूर्ती महमद करीम छागला हेही इथलेच विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांमुळे कॉलेजच्या लौकिकात खूप भर पडत गेली. कॉलेजचे पहिले प्राचार्य जे. आर. ऊर्फ नानासाहेब घारपुरे हे इंडियन लॉ सोसायटीच्या संस्थापकांपैकीच एक होते. एक यशस्वी वकील म्हणून त्यांचा दबदबा होताच. 'हिंदू लॉ' वरची त्यांची पुस्तके 'क्लासिक' मानली जातात. भरपूर पैसा देणारी प्रॅक्टिस सोडून त्यांनी कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारले होते. हा मोठाच त्याग होता. प्रथमपासूनच त्यांनी कॉलेजमधील शिक्षणाचा व एकूण व्यवस्थापनाचा दर्जा खूप उच्च राखला होता. नंतर प्राचार्य बनलेले जी. व्ही. पंडित यांनीही तीच परंपरा कायम राखली होती. ते प्रिन्सिपॉल पंडित यांना विद्यार्थ्यांविषयी खूप जिव्हाळा होता. कॉलेज म्हणजे जणू आपले कुटुंबच मानत. इंग्रजी, हिंदू लॉ व रोमन लॉ हे तीन त्यांचे शिकवण्याचे विषय होते. कॉलेजातील वर्गाच्या खोल्या खूप मोठ्या होत्या पण पंडितसरांच्या तासाला वर्ग नेहमी भरलेला असायचा. त्यांच्या इंग्रजीच्या तासाला तर इतरही काही कॉलेजमधील विद्यार्थी येऊन बसत. इंग्रजीला त्यांना पहिल्या वर्षाला Far from the madding crowd ही थॉमस हार्डीची शोकात्म कादंबरी होती. अगदी समरस होऊन त्यांनी ती शिकवली. रावसाहेबांना पंडितसरांचे शिकवणे फार आवडायचे. पहिल्या तिमाहीला इंग्रजीत शंभरपैकी त्रेसष्ट गुण मिळवून रावसाहेब वर्गात पहिले आले. पंडितसरांनी त्यांचा पेपर वर्गात सर्वांना दाखवला. इतर विषयांतही चांगले गुण होते. अधिक गुणही मिळवता आले असते, पण रावसाहेबांचे त्या दिवसांत अभ्यासाकडे फारसे लक्षही नसायचे. मित्रांच्या घोळक्यातच ते रमलेले असत. सवंग लोकप्रियतेवर ते खूष होते. त्यांचे रूममेट नाशिकचे नामदेवराव गीते यांना ते वागणे पसंत नसे, ते नाराजी व्यक्त करत. इतर मित्रही प्रेमाने कधीकधी रागवत. पण रावसाहेबांचे वागणे मात्र बरेचसे मुक्त, फुलपाखरासारखे मोकळे असे असायचे. निदान त्या सुरुवातीच्या दिवसांत तरी. त्याचे कारणही तसे समजण्यासारखे होते; आजवरच्या आयुष्यात प्रथमच रावसाहेबांना मनासारखे जगण्याची संधी इथे उपलब्ध झाली होती. आजपर्यंतच्या शैक्षणिक कारकिर्दीत रावसाहेबांना आर्थिक स्वास्थ्य असे फारसे कधीच लाभले नव्हते. एकतर हे शिक्षण एकाच शाळेत वा कॉलेजात असे झाले नाही. पाडळी, देवठाण, सिन्नर, नाशिक, संगमनेर, कोल्हापूर, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीमुळे फरफट करावी लागली. राहायची व्यवस्था बहुतेकदा नातेवाइकांकडे असे. त्यांनी वाईट वागणूक दिली अशातला भाग नव्हता; पण दुसऱ्याच्या घरी राहून शिकायचे म्हणजे काही म्हटले तरी अनेक अजुनी चालतोची वाट... १९२