पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिवस काळ्या कोटाचे जून १९५१ मध्ये पुण्याच्या लॉ कॉलेजात रावसाहेबांनी प्रवेश घेतला. त्या काळी इंटर आर्ट्सनंतर लॉला प्रवेश घेता येत असे. वर्षाच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या लॉ कॉलेजात त्यांनी घेतलेला प्रवेश हा केवळ एक उपचार होता; भूमिगत अवस्थेतून बाहेर येणे, आधी अटक आणि मग सुटका करून घेणे या घटना घडत असतानाच शेवटी पुण्यातूनच लॉ करायचे हे त्यांचे नक्की ठरलेले होते. राजकीय कार्याकडे ओढा असणाऱ्या अनेक तरुणांना त्याकाळी वकिली पेशाचे आकर्षण असायचे; वकिली आणि समाजसेवा परस्परपूरक मानली जाई. गांधी, नेहरू, पटेल, यशवंतराव चव्हाण, सावरकर यांच्यापासून अगदी मधू लिमये, मोहन धारियांपर्यंत वकिलीचे शिक्षण घेतलेल्या देशभक्तांची परंपरा खूप मोठी होती. त्यामुळे अण्णासाहेब व पुढे रावसाहेब वकिलीकडे वळले यात तसे आश्चर्य काहीच नव्हते. आणि एकदा वकील बनायचे ठरवल्यावर उत्तम कॉलेजातून शिक्षण घ्यावे असे वाटणे स्वाभाविक होते. इंडियन लॉ सोसायटीचे पुण्यातले हे कॉलेज देशभर विख्यात होते. केवळ कायद्याचे शिक्षण देणारे कॉलेज म्हणून नव्हे, तर एकूणच देशातील सर्वोत्तम दहा कॉलेजेसच्या यादीत या कॉलेजचा समावेश हमखास व्हायचा. कॉलेजची परंपरा, तेथील शिक्षणाचा दर्जा, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुखसोयी वगैरे सर्वच उत्कृष्ट होते. १९२३ साली सुरू झालेले हे कॉलेज कायद्याचे शिक्षण देणारे देशातील दुसरे कॉलेज होते. लॉ कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे अलौकिक यश मिळवले होते. भारताचे सरन्यायाधीश बनलेले प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर व यशवंत विष्णू चंद्रचूड याच कॉलेजचे माजी विद्यार्थी. हे दोघेही पुढे इंडियन लॉ सोसायटी या कॉलेजच्या पालक संस्थेचे अध्यक्षही बनले. यशवंतराव चव्हाणही इथलेच विद्यार्थी. पुढे दिवस काळ्या कोटाचे... १९१