पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मातीचा कोट व एका कोपऱ्यात बुरूज होता. ही शिंद्यांची गढी. शहाण्णव कुळी विठोबा पाटील एकेकाळी गढीचे वतनदार होते याची ही ऐतिहासिक खूण. आजही पाडळी गावाला भेट दिली की त्या कोटाचे व बुरुजाचे पांढऱ्या मातीतले अवशेष दिसतात. इंग्रज राजवटीच्या त्या काळात वर्षातून एकदा जिल्ह्याचा इंग्रज कलेक्टर आपल्या आधिपत्याखालील प्रत्येक तालुक्यामधल्या सगळ्या गावांच्या पाटलांना एकत्र बोलवत असे. त्यांची गाऱ्हाणी वगैरे सोडवण्यासाठी, तसेच सरकारी धोरणांची अंमलबजावणी नीट होते आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी. त्याला 'पाटील-दरबार' म्हणत. कलेक्टरचा अधिकार खूप मोठा असे आणि त्याने जागच्या जागी तडकाफडकी घेतलेले निर्णयही बहुतेकदा अंतिम स्वरूपाचेच असत. साहजिकच या पाटील-दरबाराला गावच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असे. रावसाहेबांचे आजोबा, विठोबा पाटील, या दरबाराला दरसाल न चुकता हजर राहत. हा सगळाच परिसर आज नाशिक जिल्ह्यात असला तरी त्या काळी अहमदनगर जिल्ह्यात समाविष्ट होता व त्यामुळे दरबारही अहमदनगरलाच भरे. तिथवरचा रस्ता धड नव्हता; बैलगाडीनेही जाणे शक्य नसायचे. त्यामुळे आजोबा घोड्यावरून जात. जाण्यायेण्यात आठ-दहा दिवस जात. एवढ्या दिवसांची सोय म्हणून बरोबर दशम्या, चटणी वगैरे न्यावे लागे. प्रवास खूप दगदगीचा आणि शिवाय असुरक्षित. आजोबांना निरोप द्यायला त्यावेळी अख्खा गाव वेशीपाशी लोटायचा. इतक्या लांबच्या प्रवासासाठी त्यांना निरोप देताना सगळ्या गावकऱ्यांचे डोळे पाणावलेले असत. गावाचा विठोबा पाटलांवर खूप जीव. कारण त्यांचे सौजन्यपूर्ण वागणे. पाटील असूनही त्यांनी कधीच कुठल्या गावकऱ्याला त्रास दिला नाही. स्थानिक स्वराज्य स्थांचा म्हणजे लोकल बोडींचा आरंभकाळ. ऐन इंग्रज अमदानीत केली गेलेली अगदी मर्यादित स्वरूपातल्या लोकशाहीची ती रुजुवात. स्थानिक कारभार काही प्रमाणात तरी चालवणाऱ्या या लोकल बोर्डाच्या निवडणुका होत. हा सगळाच प्रकार लोकांना अगदी नवा होता. मतदानाचा हक्क सार्वत्रिक नव्हता; किमान पन्नास रुपये दरसाल शेतसारा भरणाऱ्यालाच मत द्यायचा हक्क होता. त्या परिसरातल्या लोकल बोर्डाच्या पहिल्या निवडणुकीला विठोबा पाटील उभे होते; पण मतदान करताना आपले स्वतःचे मत मात्र विरोधी उमेदवाराला देऊन आले! गावच्या लोकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले तेव्हा म्हणाले, 'स्वत:लाच मत देण्याइतका मी आप्पलपोटा नाही आहे!" (6 अजुनी चालतोची वाट... १८