पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजकारणात वा चळवळीमध्ये भाग घेऊ नये असे त्यांचे मत होते. कम्युनिझमचाही त्यांचा बराच अभ्यास दिसला. त्यांच्या एकूण सौजन्यपूर्ण वागण्याने रावसाहे खूपच प्रभावित झाले. त्यांचा उमदेपणा एवढा, की कोठडीत ठेवण्याऐवजी त्यांनी खुशाल रावसाहेबांना घरी जायची परवानगी दिली. "उद्या न विसरता इथे पोलीस स्टेशनात येऊन मला भेटा, " एवढेच ते म्हणाले. रावसाहेबांचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसेना. आपल्या नगरमधल्या अनेक मित्रांना रावसाहेब त्या रात्री भेटले आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्यांनी मोरेसाहेबांच्या ऑफिसात हजेरी लावली. दरम्यान मोरेसाहेबांनी मुंबईला गृहखात्याशी आणि जिल्ह्याचे कलेक्टर आर. सी. जोशी यांच्याशी बोलणे केले होते. त्यानुसार रीतसर कागदपत्रे भरून मोरेसाहेबांनी रावसाहेबांची अधिकृतरीत्या सुटका केली. सर्व देशभरच साम्यवाद्यांना तुरुंगातून सोडण्याचे धोरण त्यावेळी सरकारने अंगीकारले होते आणि रावसाहेबांची सुटकाही बहुधा त्या धोरणानुसारच झाली होती. त्यांनी मोरेसाहेबांचे अगदी मनापासून आभार मानले. असा पोलीस अधिकारी भेटणे हे खरोखरच खूप दुर्मिळ होते. मोरेसाहेबांचा निरोप घेऊन त्या दिवशी रावसाहेब पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले आणि नगरच्या त्या हमरस्त्यावर आले तेव्हा मिनिटभर ते तसेच वाऱ्यावर उभे राहिले. मोकळ्या हवेत श्वास घेणे म्हणजे काय हे तीन वर्षांनी प्रथमच त्यांना जाणवत होते. लख्ख सूर्यप्रकाशात आसमंत न्हाऊन निघाला होता. भोवतालचे धुके आता पूर्ण निवळले होते आणि समोरची वाट स्वच्छ दिसत होती. ■ अजुनी चालतोची वाट... १८८