पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही साधले नाही. अशा अवस्थेत असताना भाऊसाहेब थोरातांनी त्यांना अण्णासाहेबांचा एक निरोप दिला; 'वाडीवऱ्हे येथे अमुक अमुक तारखेला येऊन मला भेटावे.' वाडीवऱ्हे येथील राजाराम पाटलांचा मळा हे भूमिगत कार्यकर्त्यांचे एक हक्काचे असे सुरक्षित स्थान होतेच. त्याप्रमाणे दोघे भाऊ भेटले. भाऊसाहेबही सोबत होते. रावसाहेबांना वाटले होते, की अण्णाभाऊ आपल्या नावाने त्यांच्याविरुद्ध छापल्या गेलेल्या पत्रकाविषयी रागावून काही बोलतील. पण अण्णाभाऊंनी त्या पत्रकाचा उल्लेखही केला नाही. नेहमीच्याच मनमोकळेपणे ते बोलत होते. हा अर्थातच त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. त्यांनी दिलेला सल्ला असा होता : "आपले नेते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, पण चळवळ आता संपल्यातच जमा आहे ही वस्तुस्थिती आहे. आयुष्याची इतकी वर्षे वाया गेली असे समजून तुम्ही दोघांनी आता यातून बाहेर पडले पाहिजे; उरलेल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने यापुढे तुम्ही भूमिगत न राहता सरळसरळ उघड्यावर वावरू लागावे. रावसाहेबांनी कोल्हापूरला लॉ कॉलेजात प्रवेश घ्यावा आणि वकिलीचे शिक्षण घ्यावे आणि भाऊसाहेबांनी जोर्वे येथे राहून घरचा शेतीप्रपंच पाहावा." दुसऱ्याच दिवशी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रांतिक कमिटीच्या सेक्रेटरींना रावसाहेबांनी एक तपशीलवार पत्र लिहिले. पक्षाच्या धोरणावर व कार्यपद्धतीवर त्यात खरमरीत टीका होती. 'पक्षाशी यापुढे मी संबंध कशासाठी ठेवायचा?' असा प्रश्नही शेवटी विचारला होता. तथापि पक्षाकडून त्या पत्राबद्दल काही खुलासा तर सोडाच पण साधी पोचसुद्धा आली नाही. आपल्यावरील टीकेची काहीही दखल घ्यायची नाही हे कम्युनिस्ट पक्षाचे एक धोरणच होते. परिणामत: कम्युनिस्ट पक्षापासून रावसाहेब दूर गेले, ते कायमचेच. ठरल्याप्रमाणे रावसाहेब लौकरच कोल्हापूरला गेले. चार वर्षांनंतर प्रथमच ते कोल्हापूरला आले होते. दरम्यानच्या काळात कॉ. ओलकर वारल्याचे ऐकून त्यांना फारच वाईट वाटले. पूर्वी इथे शिकत असताना ओलकरांनी त्यांना खूप जीव लावला होता. शाहुपुरीतल्या शाहू लॉ कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला. वडलांना, अण्णाभाऊंना, तसेच नगर, नाशिक इथल्या अनेक मित्रांना त्यांनी कोल्हापूरहून पत्रे पाठवली. एक पत्र अहमदनगरमधील कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसलाही पाठवले. या सगळ्या पत्रांच्या मागे त्यांनी स्वत:चे नाव व कोल्हापूरचा पत्ता मुद्दामच लिहिला होता. यातले एखादे तरी पत्र पोलिसांच्या हाती पडेल व आपला पत्ता कळताच पोलीस आपल्याला पकडायला इथे येतील अशी त्यांची अजुनी चालतोची वाट... १८६