पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवेशाने पुढे झेप घ्यायचे... आम्ही ठिणग्या लावल्या. मशाली पेटविल्या. पण क्रांतीचा मागमूसही लागला नाही. क्रांती दारात उभी आहे हा केवळ पुस्तकी पंडितांच्या बुद्धीचा कल्पनाविलास होता. कार्यकर्ते लढले, धावले, पळाले. त्यांनी धोकादायक आगीत उड्या घेतल्या, प्रसंगी आहुती पडल्या. पण क्रांती आम्हांला सापडलीच नाही. जनमानसाचा अशा निर्णायक लढ्याला पाठिंबाही नव्हता. जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्ष यांची लोकप्रियता त्या काळात कळसाला पोहोचलेली होती आणि आम्ही मात्र नेहरूंना फॅसिस्ट संबोधित होतो. नेहरूंची राजवट उलथून टाकण्याचे आवाहन लोकांना करत होतो. शेवटी काळानेच आमचे डोळे उघडले. " ( ध्यासपर्व, पृष्ठ १९३, २४३) अर्थात जीवनातल्या कुठल्याही अनुभवाला फक्त काळी बाजू नसते, अनुभव कितीही विदारक असला तरी त्याच्यातून माणूस काही ना काही उपयुक्त असेही शिकत असतोच. लाल ताज्याची साथ ही अनेक अर्थांनी रावसाहेबांचे जीवन समृद्धही करून गेली. त्या सुमारे सहा वर्षांत ते शेकडो खेड्यापाड्यांमध्ये गेले. अगणित सभा घेतल्या. अनेक निदर्शने केली. मैलोन्मैल पायी फिरले. डोंगरराने पालथी घातली. तेथील विविध तन्हांच्या लोकजीवनाचे दर्शन झाले. गोरगरिबांच्या जीवनात खूप खोलवर जाता आले. काही जीवघेण्या संकटांना ते सामोरे गेले. हे सर्व करताना जिवाची पर्वा केली नाहीं. ध्येयवादाच्या प्रेरणेने माणसाच्या अंगी अनपेक्षित बळ येते हे त्यांना पटले. १९५०च्या अखेरीस कम्युनिस्ट चळवळीतला फोलपणा रावसाहेबांना कळून चुकला होता पण ज्या चळवळीसाठी आयुष्याची सहा वर्षे दिली, आणि त्यातली तीन तर पूर्णवेळ भूमिगत राहून दिली, त्या चळवळीतून बाहेर पडणेही सोपे नव्हते. घरून किंवा इतर कुठून काहीच आर्थिक मदत नव्हती; शिवाय चळवळीतून बाहेर पडल्यावर पुढे काय करायचे हाही मोठाच प्रश्न होता. पक्षामध्ये वदूद खान हे त्यांचे वरिष्ठ होते. एक मित्र म्हणूनही ते वदूद खानना खूप मानत. या संभ्रमावस्थेत त्यांचे मार्गदर्शन व्हावे म्हणून रावसाहेब मुंबईला जाऊन त्यांना भेटले. पण वदूद खान स्वत:ही त्यावेळी तशाच संभ्रमावस्थेत होते. पक्षाच्या विचित्र कोलांट्या उड्यांमुळे तेही पार गोंधळले होते, आपण नेमक्या कुठल्या ध्येयासाठी लढतो आहोत हेच कळत नव्हते. अधिक म्हणजे पत्नीचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना भेटून मार्गदर्शनाच्या दृष्टीने फारसे लाल ताऱ्याची साथ... १८५