पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि तो सगळा वर्ग शहरीच होता; शेतीप्रधान ग्रामीण भागात युनियन्सचे प्राबल्य नव्हते; व म्हणून पक्षाची संघटनाही नगण्य होती. पक्षाचे बहुतेक सर्व वरिष्ठ नेतेही शहरीच होते; ग्रामीण भागाशी त्यांची नाळ कधीच जोडलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कम्युनिस्ट विचारधारा ही कामगारांना क्रांतीचे दूत मानणारी होती. केवळ कामगारच क्रांती करू शकतो; शेतकरी हा मात्र क्रांतिविरोधी असतो, तो 'प्रोलेटरिएट' च्या व्याख्येत बसूच शकत नाही अशी 'कॉमिन्टर्न'ची उघडउघड भूमिका होती. या मुद्दयावरती स्टालिन आणि माओ यांच्यात मतभेद होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मात्र मुख्यतः रशियन प्रभावाखालीच होता. कामगार विरुद्ध मालक ही वर्गयुद्धाची (क्लासवॉरची) संकल्पना शहरी भागातील कारखान्यांमध्ये सहज समजणारी होती, पण ग्रामीण भागात शेतकरी हा शेतीचा मालकही होता आणि शेतात राबणारा श्रमजीवीही होता व त्यामुळे ग्रामीण जनतेला वर्गयुद्धाची मूलभूत संकल्पना समजावून सांगणे तसे अवघडही होते. कम्युनिझमच्या ग्रामीण भागातील रुजुवातीमध्ये अशा काही मूलभूत अडचणीही होत्या; पक्षाने वेळोवेळी 'कॉमेन्टर्न' च्या आदेशांमुळे मारलेल्या कोलांट्या उड्यांमुळे त्या अडचणींमध्ये मोठी भरच पडली. पक्षाच्या असल्या अनेक चुकांचे भयानक परिणाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भोगावे लागले. अनेकांचे बळी गेले. हे सर्व जण जनतेसाठी जिवावर उदार होऊन लढणारे कार्यकर्ते होते. सार्वजनिक जीवनातील तो अतिशय मोलाचा असा ठेवा होता. मूर्खपणाच्या धोरणामुळे त्या बिचाऱ्यांच्या जीवनाची राख झाली. असे का घडले याची कारणमीमांसा करताना रावसाहेब लिहितात : "अतिशय अविचारी आणि आततायी कार्यक्रम पक्षकार्यकर्त्यांना देण्यात आला होता. भावनातिरेकाने, आवेशपूर्ण पद्धतीने कार्यकर्त्यांच्या पुढे भाषणे करण्यात येत होती. क्रांती उंबरठ्यापाशी येऊन ठेपली आहे, जनतेत फार आहे, लोक पेटून उठणार आहेत, क्रांतीचा आगडोंब उसळणार आहे, फक्त आपण पुढे होऊन ठिणगी लावली पाहिजे, अशा तऱ्हेच्या स्वप्नरंजनात कार्यकर्त्यांना गुंगविण्यात येत होते. त्यासाठी कुठेतरी अपवादात्मक घडलेल्या घटनांचे दाखले देण्यात येत होते. ह्या पुढाऱ्यांचा जनतेशी संबंधही राहिलेला नव्हता. त्यांच्या डेनमधून त्यांचे बुद्धिविलासाचे खेळ चालत. मार्क्स, स्टॅलिन, लेनिन यांच्या ग्रंथांतील सोईचा वाटेल असा काही मजकूर तुकड्यातुकड्याने काढून क्रांतीच्या प्रबंधाची मूर्ती बनविण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. अतिशय हास्यास्पद असे हे विचार होते. पक्षकार्यकर्ते शेतकरी कामगारांचे राज्य येणार या कल्पनारम्य स्वप्नरंजनात गुंगून जायचे आणि पुढील मागील परिणामांची क्षिती न बाळगता अजुनी चालतोची वाट... १८४