पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अहमदनगर जिल्हा 'लाल' बनला आहे, असे काही पत्रकार मित्रांनी कुठे कुठे छापले आणि ते खरेच आहे असे या कार्यकर्त्यांना स्वतःलाही वाटायला लागले. खरे सांगायचे तर प्रत्यक्षात लोक आपल्या पाठीशी नाहीत याची साक्ष पटावी असे प्रसंग अधूनमधून येत होते. पण आपल्याला सोयीचे तेवढेच बघायचे आणि सोयीचा असाच प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ लावायचा अशी सवय झाल्यावर माणूस वास्तवापासून तुटतोच. उदाहरणार्थ, १९४६साली झालेल्या असेंब्लीच्या निवडणुका. जिथे रावसाहेबांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सर्वाधिक वावर होता त्या नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात सहा तालुके होते व त्यांचा एक विधानसभा मतदारसंघ होता. चंद्रभान आठरे पाटील हे तिथले कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते होते व त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिली होती. पण त्या तथाकथित 'लाल' मतदारसंघातही दत्ता देशमुख हे काँग्रेसचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते; आठरे पाटलांचे तर डिपॉझिटसुद्धा जप्त झाले होते ! अन्य देशाप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील वातावरणही त्यावेळी पूर्ण काँग्रेसमय झाले होते. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील युवकांचा मेळावा संगमनेर येथे आयोजित केला होता. त्यात भास्करराव दुर्वे यांचा प्रमुख पुढाकार होता. प्रवरा व म्हाळुंगी या नद्यांच्या संगमापाशी भव्य मंडप उभारला होता. अच्युतराव पटवर्धनांचा सन्मान म्हणून मंडपाला 'अच्युतनगर' हे नाव दिले होते. शहरभर झेंडे-प -पताका लागल्या होत्या, रस्तोरस्ती रांगोळ्या काढल्या होत्या. सानेगुरुजी अध्यक्षस्थानी होते. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेली; सभास्थानी पोचल्यावर जागोजागी सुवासिनींनी त्यांना ओवाळले. लोकांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह होता. पण दुर्दैवाने कम्युनिस्ट नेत्यांना यातले काहीच दिसत नव्हते. भास्करराव दुर्वे किंवा सानेगुरुजी यांच्याविषयी पूर्वी रावसाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रचंड आदर होता; पण आता पक्षाने मात्र त्यांना 'बुइव' आणि 'प्रतिगामी' ठरवले होते; लोकयुद्धाचे दुष्मन मानले होते. काँग्रसच्या मेळाव्याला शह म्हणून कम्युनिस्टांनी आपली स्वतंत्र सभा जाहीर केली. संगमनेरलाच. नेहरू चौकात, रात्री नऊ वाजता. कॉ. प्रभाकर बर्डे यांचा त्यात पुढाकार होता. पण त्यांनी सभेत सुरू केलेले आवेशपूर्ण भाषण त्यांना लगेचच थांबवावे लागले; कारण दगडफेक करून लोकांनी ती सभा चक्क उधळून लावली. कम्युनिस्ट लोकांपासून किती तुटले होते याचे हे एक ज्वलंत उदाहरण होते. पण या सगळ्यापासून पक्षाने काहीही बोध घेतला नाही; जणू हे काही त्यांना दिसतच नव्हते. कम्युनिस्ट पक्षाची वाढ ही मुख्यतः कामगार युनियन्सना धरून झाली होती लाल ताऱ्याची साथ... १८३