पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पक्षाच्या प्रचारदौऱ्यावर होते. निमगावजाळी या गावी त्यांनी एका संध्याकाळी प्रचारसभा आयोजित केली होती. बरेच लोक आले होते; पण वक्त्यांपासून दूर अंतरावर बसले होते. सभा संपताच ते घाईघाईने आपापल्या घरी निघून गेले. वक्त्यांना भेटायला, त्यांची विचारपूस करायला कोणीही थांबले नाही; वक्त्यांकडे कोणी ढुंकूनही बघितले नाही. वस्तुस्थिती अशी होती, की हे गाव कट्टर काँग्रेसवाल्यांचे होते आणि या तरुण कम्युनिस्ट विद्यार्थ्यांनी काँग्रेसवर केलेली टीका त्यांना मुळीच आवडली नाही. 'काँग्रेस ही शेटजी-भटजींची' अशा विधानांमुळे तर ते या वक्त्यांवर संतापलेच होते. आतापर्यंतच्या बहुतेक गावी त्यांना कोणी ना कोणी स्थानिक माणसे मुक्कामाला आग्रहाने घरी बोलवत. पण या गावातला हा कमालीचा थंड प्रतिसाद त्यांना खूप संतापजनक वाटला. दिवसभरच्या पायपिटीमुळे तिघांना भूक तर अगदी मरणाची लागली होती. सुदैवाने रस्त्यावर एक दुकान त्यांना उघडे दिसले. तेथे त्यांनी थोडेसे शेंगदाणे आणि गूळ विकत घेतला आणि या गावात थांबणेच नको म्हणून रात्रीचेच मैल-दोन मैल वाट तुडवत ते गावाबाहेर गेले. तिथे सडकेलगत एक नांगरलेले शेत होते. तिथेच शेंगदाणे आणि गूळ खाऊन ते नांगरटीतच झोपले. निमगावजाळीचा हा अनुभव आता त्यांना एकदम आठवला. सिंहावलोकन करताना त्यांना हेही जाणवले, की ज्याला ते 'सर्वसामान्य जनतेने केलेले स्वागत' म्हणत होते ते प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या स्वत:च्याच कुटुंबीयांनी किंवा ओळखीतल्या माणसांनी केलेले आदरातिथ्य होते; कार्यकर्ता म्हणून वा भूमिगत असताना जो आसरा मिळायचा तो ह्याच सुहृदांकडून. त्यामागे वैचारिक सहमती किंवा क्रांतिकार्याला मदत हा भाग नव्हता, तर ते केवळ ग्रामीण आतिथ्यधर्मातून किंवा व्यक्तिगत जिव्हाळ्यातून केलेले स्वागत होते. सावकारशाहीविरुद्ध किंवा शेटजी-भटजींविरुद्ध जेव्हा हे कार्यकर्ते भाषणे द्यायचे त्यावेळी लोक ती ऐकायला गर्दी करायचे, कारण आपल्या गरिबीला आपण स्वतः जबाबदार नाही, तर दुसऱ्या कोणामुळेतरी ती आपल्याला भोगावी लागते आहे ही जाणीव कोणालाही सुखद वाटेल अशीच होती आणि ज्यांच्या शोषणामुळे हे घडत आहे त्यांचा नि:पात करायला हे कम्युनिस्ट कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत ही भावना त्या कार्यकर्त्यांविषयी व्यक्तिगत पातळीवर आपलेपणा निर्माण व्हायला पुरेशी होती. सभांमधील गाण्यांमुळे वगैरे त्या आपलेपणाला एक भावनिक किनारही लाभायची. पण याचा अर्थ त्या श्रोत्यांना कम्युनिस्टांचे विचार पटत होते असा मात्र अजिबात नव्हता. दौ-यावरती असताना मिळणाऱ्या लोकांच्या अशा बाह्य प्रतिसादामुळे सगळा अजुनी चालतोची वाट... १८२