पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळवणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य असायची. शिवाय चळवळीच्या कामात खूप वेळ जात असतानाही त्यांनी हे यश मिळवले होते. पण यात त्यांना ना काही आनंद वाटला, ना काही अभिमान. उलट त्यांची प्रतिक्रिया त्या निकालाला कस्पटासमान लेखणारी होती. "हे भांडवलदारांचे शिक्षण आणि ही भांडवलदारांची परीक्षा! त्या निकालाला काय किंमत आहे?" असे म्हणत त्यांनी तो निकाल बाजूला सारला. एखाद्या विद्यार्थ्याने असे बोलणे म्हणजे जरा जादाच फुशारकी मारण्यासारखे होते. पण निकालाकडे त्यांनी दाखवलेल्या या दुर्लक्षाचे भोवतालच्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांनी खूप कौतुकच केले. 'पक्षाच्या कामापुढे हा परीक्षेचा निकालही तुच्छ मानतो ! ही खरी जाज्वल्य पक्षनिष्ठा!' अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. त्यांची प्रतिक्रिया ही अशीच असेल हे रावसाहेबांनाही ठाऊक होते; किंबहुना म्हणूनच रावसाहेबांनी परीक्षेच्या निकालाला इतके तुच्छ लेखले होते. पक्षातील एकूण तत्कालीन वातावरण कशा प्रकारचे होते यावर एखाद्या संपूर्ण प्रकरणातून ही टाकता येणार नाही एवढा प्रकाश या एकाच प्रसंगातून पडतो. पक्षाच्या वेदीवर इथे व्यक्तिगत अस्मितेचा बळी दिला जात होता. हे पूर्णत: अनैसर्गिकच होते. आत्मलोपाच्या अतिरेकाचे पर्यवसान पक्षश्रेष्ठत्वाविषयीच्या अवास्तव कल्पनेमध्ये होत होते; दबलेला व्यक्तिगत अहंकार अधिकच प्रखर बनून सामूहिक अहंकारात परावर्तित होत होता. त्या वादळी रात्री पाडळीला घरी गेल्या गेल्या प्रेमाने वागणाऱ्या वडलांना सुनावलेले बोलणे किंवा अहमदनगरला आपले कौतुक करणाऱ्या रावसाहेब पटवर्धनांसारख्या ज्येष्ठ नेत्यांशी घातलेला वाद हा केवळ वयसुलभ तडफदारपणा नव्हता; त्यात आपल्या विचारधारेला एकमेवाद्वितीय मानणारा अहंकारही होता. १९५० सालच्या अखेरीस भारतातील कम्युनिस्ट पक्षाची ही जी अवस्था झाली होती त्यामुळे रावसाहेबांसारखे प्रामाणिक कार्यकर्ते अत्यंत पराभूत अशा, खूप खचलेल्या अशा मनःस्थितीत पक्षाच्या आजवरच्या एकूण वाटचालीचे सिंहावलोकन करू लागले; आत्मचिंतन करू लागले. चळवळ संपल्यातच जमा असल्याने त्यांची गेली काही वर्षे चालू असलेली अविश्रांत धावपळही आता एकाएकी थांबली होती. या आत्मचिंतनाला पोषक असा निवांतपणाही आता कधी नव्हे तो त्यांना मिळाला होता. अगदी सुरुवातीला त्यांना आठवू लागला तो पाच वर्षांपूर्वीचा, म्हणजे १९४५ सालचा, संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी या गावचा एक प्रसंग. भाऊसाहेब थोरात, धर्मा पोखरकर आणि रावसाहेब असे तिघे जण त्यावेळी कम्युनिस्ट लाल ताऱ्याची साथ... १८१