पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तसे पत्रक मात्र आपण कुठल्याही वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी दिले नव्हते असेही ते म्हणतात. त्यांच्या मते इतर काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी मुद्दामच त्यांच्या नावे असे पत्रक प्रसिद्ध करायचा उपद्व्याप केला होता. अण्णासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध रावसाहेब शिंदे यांचे पत्रक प्रसिद्ध होणे यात जनमानसाच्या दृष्टीने एक सनसनाटी होती, 'न्यूज - व्हॅल्यू' होती व त्यानुसार त्या पत्राचा खूप बोलबाला झाला. अशाप्रकारे कार्यकर्त्यांना आपल्या नजिकच्या नातेवाइकांपासून तोडण्यात पक्षनेत्यांना काहीही गैर वाटत नसे. स्थानबद्ध असलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरून आलेली पत्रेही तिथेच स्थानबद्ध असलेले नेते आधी वाचत आणि त्यांनी सेन्सॉर केलेली पत्रेच कार्यकर्त्यांपर्यंत पोचत. अगदी पती-पत्नींनी एकमेकांना लिहिलेली पत्रेही अशीच सेन्सॉर केली जात. नाशिकच्या तुरुंगात स्थानबद्ध असलेले एक पक्षनेते बाबूराव ऊर्फ पी. पी. जोशी यांनी स्वतःच एकदा ही गोष्ट रावसाहेबांना सांगितली होती. जवळीक वा स्नेहबंध हे पक्षांतर्गतच असावे, पक्षाबाहेरच्याशी नव्हे असे धोरण असायचे. पुस्तकेही वाचली जायची ती फक्त कम्युनिस्ट विचारसरणीचीच; कुठलाही वेगळा विचार मांडणारी नाही. अत्यंत झापडबंद विचार करण्याची मग पक्षकार्यकर्त्यांना सवय होई; पक्षात राहायचे असेल तर असाच विचार करावा लागेल हेही त्यांच्या मनावर बिंबवले जाई. कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत विकासालाही पक्षात गौण स्थान होते; तो विकास पक्षाच्या फायद्याचा असेल तर ठीक आहे, एरवी तो निरर्थकच अशी भूमिका असायची. हल्लीचे शिक्षण हे भांडवलदारी शिक्षण आहे, हल्लीचे वाङ्मय हेदेखील भांडवलदारी वाङ्मय आहे; त्यामुळे असे शिक्षण घेण्यात वा असे वाङ्मय वाचण्यात वेळ व्यर्थ घालवू नये अशी पक्षाची भूमिका होती आणि या भूमिकेचा पूर्ण पगडा रावसाहेबांच्या मनावरही त्याचे एक ठळक द्योतक म्हणजे त्यांच्या इंटर आर्ट्सच्या परीक्षेचा मे महिन्यात निकाल लागल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया. कष्ट करून आणि फ्रीशिप मिळवून शिक्षण घेणाऱ्या कोणाही गरीब विद्यार्थ्याला खरे म्हणजे परीक्षेच्या निकालाविषयी विलक्षण औत्सुक्य असायला हवे; कारण खूपदा त्याचे भवितव्य या निकालावर अवलंबून असते. रावसाहेबांना मात्र या निकालाविषयी जराही औत्सुक्य नव्हते, कित्येक दिवस ते निकाल आणायला गेलेसुद्धा नाहीत. बऱ्याच आठवड्यांनंतर कोणातरी मित्राने तो निकालाचा कागद आणला आणि रावसाहेबांना दाखवला. तेव्हाच रावसाहेबांना कळले, की ते परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत; आणि तेही सेकंडक्लासमध्ये. खरे तर याचा त्यांना आनंद व अभिमान वाटायला हवा होता. कारण त्या काळी फर्स्ट क्लास अजुनी चालतोची वाट... १८०