पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्हते. म्हणूनच १९५०च्या अखेरीस 'कॉमिन्फॉर्म' मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षावर जोरदार टीका करणारा एक खळबळजनक लेख प्रसिद्ध केला गेला. लेखाचा साधारण आशय होता : 'भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण संपूर्णत: चुकीचे आहे. नेहरू सरकारला ते करत असलेला विरोध आततायी असून त्यामुळे पक्षाचे नुकसानच होणार आहे. नेहरू सरकारला ‘फॅसिस्ट' म्हणून संबोधणे हास्यास्पद आहे. अशा चुकीच्या धोरणाचा या पक्षाने त्वरित त्याग करावा.' तो लेख प्रसिद्ध झाल्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ताबडतोब सरकारविरोधी चळवळ मागे घ्यावी लागली; कारण शेवटी कॉमिन्टर्नच्या मर्जीविरुद्ध ते काहीच करू धजावत नव्हते. पक्षाने मारलेल्या या तिसऱ्या कोलांटी उडीमुळे देशभर त्यांचे हसे झाले. कम्युनिस्ट पक्ष खूप चुकीच्या दिशेने चालला आहे ही गोष्ट अण्णासाहेब शिंदे यांच्या खूप पूर्वीच लक्षात आली होती. येरवडा तुरुंगात असतानाच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाला एक विस्तृत पत्र लिहून त्या पत्राद्वारे पक्षाचा राजीनामा दिला होता. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले होते, "चळवळ आततायी आणि चुकीच्या मार्गाने जात आहे. पक्षकार्यकर्त्यांचे बळी जाण्यात याचे पर्यवसान होणार आहे. तसेच जनतेपासून आपण पूर्णतया अलग पडणार आहोत. चळवळीचे यामुळे अपरिमित नुकसान होणार आहे. ही पक्षाची विचारसरणी मला मान्य नाही. म्हणून नाइलाजास्तव मी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देत आहे.' }} कम्युनिस्ट पक्षाने त्यातील विचारांची दखल तर घेतली नाहीच, पण उलट "पक्षाच्या घटनेत राजीनाम्याची तरतूद नसल्याने तुमचीच पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे” असे उत्तर अण्णाभाऊंना दिले. 'संधिसाधू, भेकड, भांडवलदारांचे व साम्राज्यवाद्यांचे हस्तक' अशा शेलक्या संबोधनांनी त्यांचा निषेध केला. इतर सगळ्या कम्युनिस्ट मित्रांनी या 'दगाबाजी'बद्दल अण्णासाहेबांना जणू वाळीतच टाकले. चळवळीतले वर्षानुवर्षांचे मित्र आता एकाएकी त्यांना टाळू लागले; त्यांना 'अस्पृश्य' मानू लागले. रावसाहेब त्यावेळी भूमिगतच होते आणि त्यांच्या मनावरचा कम्युनिस्टांचा पगडा त्यावेळी जबरदस्त होता. अण्णाभाऊंचा निषेध करणारे एक पत्रक त्यांच्या नावाने वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. त्यावेळी आपली भूमिका ज्येष्ठ बंधूंच्या विरोधातलीच होती व आपल्या बोलण्यात त्यांनी अण्णाभाऊंना संधिसाधू व भेकड म्हणत त्यांच्यावर यथेच्छ टीका केली होती हे रावसाहेब मान्य करतात, पण लाल ताऱ्याची साथ...