पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"कम्युनिस्ट पक्षाच्या मते देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नव्हतंच; गोया भांडवलदारांची जागा आता काळ्या भांडवलदारांनी घेतली होती एवढाच काय तो बदल झाला होता; किंबहुना स्वतंत्र भारताचं काँग्रेस सरकार उलथून पाडायचं हेच पक्षाचं अधिकृत धोरण होतं व त्याच्या पूर्तीसाठीच पक्षाने स्वतंत्र क्रांतीचा लढा उभारला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट या दिवशी विशेष महत्त्वाचं असं काही आहे असं मला त्यावेळी वाटलंच नाही.' }} भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशातील जनतेत रुजू शकला नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे या पक्षाची नाळ ही भारतीय परिस्थितीपेक्षा रशियाशी अधिक जोडलेली होती. रशियामध्ये १९१७ साली झारची सत्ता संपुष्टात आली व कम्युनिस्ट सत्तेवर आले. याच सत्तांतराला बोल्शेव्हिक क्रांती असेही म्हणतात. केवळ एका राष्ट्रात कम्युनिस्ट सत्तेवर येऊन पुरेसे नाही तर जगभर सगळीकडेच कम्युनिस्टांची सत्ता स्थापन व्हायला हवी, या भूमिकेतून १९१९ साली मॉस्कोमध्ये 'कॉमिन्टर्न' ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली होती. 'कॉमिन्फॉर्म' नावाचे एक संस्थेचे मुखपत्र होते व त्याच्यातून जगभरच्या सर्व कम्युनिस्टांना मार्गदर्शन केले जाई. जगभरच्या कम्युनिस्ट पक्षाला अर्थपुरवठाही कॉमिन्टर्नमार्फतच होई व कॉमिन्टर्न जे सांगेल त्याप्रमाणेच जगभरचे कम्युनिस्ट पक्ष काम करत. भारतातील कम्युनिस्ट पक्षही याला अपवाद नव्हता. कॉमिन्टर्नवर रशियन कम्युनिस्ट पक्षाचे, म्हणजेच रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांचे, संपूर्ण प्रभुत्व होते. साहजिकच रशियाच्या फायद्याचे ठरेल असेच धोरण कॉमिन्टर्न ठरवे व त्याप्रमाणेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाला वागावे लागे. याचाच अर्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण हे भारतातल्या परिस्थितीनुसार न ठरता मॉस्कोहून येणाऱ्या आदेशांनुसार ठरायचे. त्यामुळे पक्षाला अनेक कोलांट्या उड्या माराव्या लागत. उदाहरणार्थ, आपल्या स्थापनेपासूनच रशियातील कम्युनिस्ट सत्तेचा भांडवलशाही हा क्रमांक एकचा शत्रू होता व ते त्यांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगतच होते. ब्रिटन हा भांडवलशाहीचा मेरुमणी; साहजिकच ब्रिटिशांविरुद्ध चाललेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कम्युनिस्टांचा पूर्ण पाठिंबा होता. पण नंतर २२ जून १९४१ रोजी हिटलरने आपली फौज रशियात घुसवली व त्याच क्षणी कम्युनिस्ट रशियाचे हितसंबंध पालटले; हिटलरला हरवण्यासाठी भांडवलशाही ब्रिटन आणि कम्युनिस्ट रशिया यांनी हातमिळवणी केली. त्याच क्षणी भारतातील स्वातंत्र्यलढ्याला असलेला रशियाचा, व म्हणून कम्युनिस्ट पक्षाचा, पाठिंबा संपला. उलट ब्रिटनला युद्धकार्यात लाल ताऱ्याची साथ... १७७