पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बसले. यानंतर पोलिसांनी प्रचंड दडपशाही केली व त्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण पसरले. स्थानिक कार्यकर्त्यांना या दडपशाहीमुळे खूप त्रास सहन करावा लागला व त्यांचे मनोबळ त्यामुळे खच्ची झाले. एरंडगाव आणि राजापूर या दोन्हीही गावांवर सामुदायिक दंड आकारण्याचा आदेश सरकारने जारी केला. दोन्ही गावांतील सर्वसाधारण जनता त्यामुळे विनाकारण भरडली गेली. हे सगळे कम्युनिस्ट पक्षामुळे आपल्याला भोगावे लागले ही भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली व त्यामुळे पक्ष अधिकच बदनाम झाला. हळूहळू १९५० साल संपत आले. बरेचसे कम्युनिस्ट पुढारी तोवर पकडले गेले होते. जिल्ह्यातील प्रमुख पुढारी चंद्रभान आठरे पाटील हेदेखील पकडले गेले होते. चळवळीची पीछेहाट होऊन ती थंडावल्यासारखी झाली होती. बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांपुढे कुठलाच निश्चित कार्यक्रम नव्हता. काय करावे याबाबत गोंधळाची स्थिती होती. खासगी गाठी- भेटी घेणे व चर्चा एवढेच आता कामाचे स्वरूप राहिले होते. व एकूण देशातली परिस्थितीही फार काही वेगळी नव्हती. कम्युनिस्टांच्या जहाल संघर्षाचा जोर सहा-सात महिन्यांतच ओसरू लागला. कम्युनिस्टांचे मोठे शक्तिस्थान म्हणजे मुंबईतील गिरणी कामगार युनियन डांगे - मिरजकर - पाटकर वगैरे नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संप पुकारला, पण तो अयशस्वी ठरला. बंगालमधल्या ज्यूट कामगारांचा संपही असाच अपयशी ठरला. तीच गत कोळसा खाणींमधील संपाची झाली. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनतर्फे गाड्यांचा राष्ट्रव्यापी संप पुकारला गेला, पण तो एक- दोन दिवसांतच मोडला गेला. याउलट कम्युनिस्टांच्या समस्त क्रांतीमुळे भारत सरकार कमजोर होण्याची शक्यता कणभरही कुठे दिसत नव्हती. देशभर काँग्रेस पक्ष अधिकाधिक लोकप्रिय होत होता आणि कम्युनिस्ट पक्ष मात्र पूर्णपणे लोकांपासून अलग पडत चालला होता. कम्युनिस्ट पक्ष जनतेपासून किती तुटला होता याचे एक द्योतक म्हणजे स्वातंत्र्यदिनाबद्दलची त्यांची अनास्था. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला त्यावेळी रावसाहेब इंटर आर्ट्सलाच शिकत होते. खरेतर १९४२च्या स्वातंत्र्य आंदोलनात रावसाहेबांनी खूप सक्रिय सहभाग घेतला होता व त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा त्यांच्या आयुष्यातला एक संस्मरणीय क्षण असायला हवा होता; त्या दिवशी त्यांनी आनंदाने जल्लोष करायला हवा होता. पण तेव्हा तसे काही घडल्याचे दिसत नाही. त्यांच्या लेखनातही १५ ऑगस्टचा कुठे विशेष उल्लेख केल्याचे आढळत नाही. याबद्दल अलीकडेच एकदा बोलणे निघाले असताना रावसाहेब म्हणाले, अजुनी चालतोची वाट... १७६