पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटत नाहीत; गहाण पडलेल्या जमिनी वा इतर मालमत्ताही आपोआपच ऋणकोच्या ताब्यात जात नाही; अनेक कायदेशीर बाबी यात गुंतलेल्या असतात. या घटनेसंदर्भातलेही अनेक खटले पुढे कोर्टात वर्षानुवर्षे चालले. पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने चळवळ अतिजहाल दिशेने चालवण्याचे आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणूनही काही अतिरेकी घटना घडल्या. उदाहरणार्थ, १९५०मध्ये शेवगाव तालुक्यातील एरंडगाव या गावी धान्याचे सरकारी गोडाउन फोडून गोरगरिबांसाठी ते धान्य लुटण्याचा कार्यक्रम पक्षश्रेष्ठींच्या पुढाकारातून हाती घेण्यात आला. एकनाथ भागवत यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा धान्य गोदामावर नेला गेला. गोडाउनच्या संरक्षणासाठी सशस्त्र पोलीस आले होते. लोकांचा जमावही मोठा जमला होता. नेत्यांनी आदेश देताच जमावाने गोडाउन फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. कुलूप फोडून आतील धान्याची पोती बाहेर आणली जाऊ लागली. गोदामासमोरच एक जुना बुरूज होता व त्यावर हत्यारी पोलीस तैनात होते. मागे हटण्याचा पोलिसांचा आदेश जमावाने मानला नाही. लाठीमार करूनही जमाव आटोक्यात येईना. शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि त्यात नऊ शेतकरी ठार झाले, शेकडो जखमी झाले. अतिशय करुण अशी ती घटना होती. त्याच वर्षी असाच दुसरा एक हिंसक प्रकार राजापूर या संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या खूप जागृत अशा गावी झाला. तिथे पुढाकार घेतला होता तो रावसाहेब नेतृत्व देत असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने पक्षश्रेष्ठींच्या उत्तेजनातून ९ मार्च १९५० रोजी तिथे एक शेतकरी परिषद जाहीर झाली होती. त्यासाठी स्थानिक व बाहेरचे असे सुमारे चारशे ते पाचशे लोक जमले होते. गावात कलम १४४ लागू केले गेले होते. पण लोकांचा निध जबरदस्त होता. मोठा फौजफाटा सरकारने गावात तैनात केला होता. जमावबंदीचा आदेश झुगारून सकाळी आठच्या सुमारास लोकांनी परिषदेच्या स्थळी जायला सुरुवात केली. जमावात विद्यार्थ्यांची संख्या बरीच होती. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. पण लोक ऐकेनात. उलट त्यावेळी नेत्यांच्या आदेशानुसार पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न काही लढाऊ विद्यार्थ्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात चार विद्यार्थी धारातीर्थी पडले, अनेक जखमी झाले, शे-दीडशे लोकांना अटक झाली. या दोन्ही गावांतील घटनांमुळे चळवळीचे मोठे नुकसान झाले. एकतर नऊ शेतकरी आणि चार विद्यार्थी पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करताना जीव गमावून लाल ताऱ्याची साथ... १७५