पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तालुक्यातील काही कार्यकर्ते हजर होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे तीस-चाळीस जणांचा गट एका रात्री आठच्या सुमारास हातात लाल झेंडे वगैरे घेऊन, आपापल्या भाकऱ्या बांधून घेऊन राजापूरहून निघाला व चालत चालत भल्या पहाटे खिरविरे गावात दाखल झाला. मुरलीधर नवले सगळ्यात आघाडीवर होते. धोतर, सदरा व डोक्याला एक ऐटबाज पटका असा त्यांचा वेश होता. छातीवर काडतुसांचा पट्टा लोंबकळत होता. हातात बंदूक होती. सावकार अर्थातच सहजासहजी तिजोरी उघडत नसत. चांगलीच दमदाटी करावी लागे. प्रसंगी बंदूक त्यांच्या छातीवर रोखून धरावी लागे. त्यांच्या बायका आड येत, हातापाया पडत. त्यांना बाजूला सारावे लागे. अगदी नाइलाज झाल्यावर मगच सावकार तिजोरी उघडत. कार्यकर्ते मग तिजोरीतले दस्तऐवज तेवढे ताब्यात घेत. तिजोरीची उलथापालथ करताना आतले सोनेनाणे, दागदागिने आणि रोकड जमिनीवर पडे. पण कोणीही कार्यकर्ता त्या कशालाही हात लावत नसत. स्त्रियांशीही सभ्यपणेच वागत. आपण चोर-दरोडेखोर नाही तर क्रांतिकारक आहोत ही त्यांची जाणीव अगदी सुस्पष्ट होती. अशा प्रकारे खिरविरे गावातून गोळा केलेले सगळे दस्तऐवज कार्यकर्त्यांनी गावातल्या देवळापुढे आणले. जवळजवळ अख्खा गाव त्या जागी जमला. ज्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली असे जवळपासच्या खेड्यांतले अनेक लोकही त्या जागी पळतपळत आले. सर्वांसमोर ते दस्तऐवज पेटवून त्यांची जाहीर होळी करण्यात आली. “आजपासून सावकारांच्या कर्जातून तुम्ही मुक्त झाला आहात. सावकारांकडे गहाण पडलेल्या किंवा विकल्या गेलेल्या तुमच्या जमिनी आता परत तुमच्या झाल्या आहेत. सावकाराकडे साल घालणे किंवा फुकट काम करणे हे आजपासून बंद झाले आहे," असे सगळ्यांसमोर जाहीर करण्यात आले. लोकांनी जल्लोष केला. त्यानंतर लगेचच 'लाल बावटा की जय' अशा घोषणा देत सगळे कार्यकर्ते जसे आले होते तसेच पुन्हा पसार झाले. दक्षिण भारतात पूर्वी अशाच प्रकारची एक चळवळ झाली होती; रोखेफाडीची चळवळ (डेक्कन रायट्स ) या नावाने ती प्रसिद्ध आहे. आनं सावकारांचे दस्तऐवज जाळण्याची अकोले तालुक्यातील ही घटना एक क्रांतिकारक घटना मानली गेली. कारण यामागे कोणाही वरिष्ठ पक्षनेत्यांचा हात नव्हता; स्थानिक नेत्यांच्या पुढाकारातूनच ही घडली होती. जनतेवर होणाऱ्या अन्यायाचे यात एकप्रकारे परिमार्जन होत होते. जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा या कृत्याला मिळाला आणि त्या अर्थाने ही जनतेची चळवळ ठरली. अर्थात येथे हेही नमूद करायला हवे की केवळ दस्तऐवज जाळल्यामुळे सावकारी पाश रातोरात अजुनी चालतोची वाट... १७४