पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ढू कारण नगर जिल्हा हा पक्षकार्याचा एक मोठाच मानबिंदू होता. हा दौरा आखण्याची जबाबदारी भाऊसाहेब थोरातांवर सोपवली गेली. सगळा प्रवास अर्थातच भूमिगत राहून करायचा होता. परुळेकर जोडप्याला लपवून ठेवणे हे फारच अवघड होते. शामराव उंचेपुरे, धिप्पाड होते; गोदूताई खूपच सुंदर, गोऱ्यापान होत्या. दोघांचेही बोलणे- राहणे पूर्ण शहरी होते. ग्रामीण भागात तर ते अधिकच उठून दिसायचे. पण तरीही भूमिगत कार्यकर्त्यांनी खूप शिताफीने ही जबाबदारी पार पाडली. शामरावांनी या दौऱ्यासाठी फेटा, कोट व धोतर असा पोशाख घेतला होता तर गोदूताई ग्रामीण पद्धतीने नऊवारी लुगडे नेसत असत. भाऊसाहेब शक्यतो स्वत:च्या किंवा मित्राच्या आडगावी असलेल्या घरी दोघांना ठेवत. सोनेवाडी येथील रावसाहेबांच्या मावशी व काका यांच्या भुसाऱ्यातही ते बरेच दिवस होते. रावसाहेबांच्या पाडळी गावातल्या चर्मकार चिमामामा शेलार यांच्याही घरी त्यांना काही दिवस ठेवले होते. त्यांचा प्रवास शक्यतो बैलगाडीने केला जाई, पण एकदा रात्रीच्या पॅसेंजर ट्रेननेही त्यांना प्रवास करावा लागला रेल्वेच्या सीटखाली सामान ठेवायची जी जागा असते त्या जागेत स्वत:ला सामानाप्रमाणे कोंबून घेऊन ! हा सगळा दौरा पार पाडताना नाशिक जिल्ह्यातील व अरवली ते मुंबई रेल्वेप्रवासाची सर्व व्यवस्था रावसाहेबांनी केली होती. - कम्युनिस्टांच्या जहाल कारवायांना या दौऱ्यानंतर अधिकच धार आली. उदाहरणार्थ, अकोले तालुक्यातील खिरविरे गावचा सावकारांविरुद्धचा लढा. खिरविरे हे डोंगरातले गाव. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे. तिथल्या कुणबी आणि आदिवासी लोकांच्या गरिबीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिथले आठ-दहा सावकार गब्बर झाले होते. प्रॉमिसरी नोटा, गहाणखते, खरेदीखते, सालखते वगैरे अनेक प्रकारचे दस्तऐवज त्यांनी कर्ज देण्यापूर्वी लिहून घेतले होते. अडल्यानडल्या गरिबांना दस्तऐवजावर अंगठा उमटवण्यापलीकडे काही गत्यंतरच नसायचे. त्यांची बहुतेक मालमत्ता गहाणच पडली होती. या सावकारांनी परिसरातील जनतेला एकप्रकारे आपले वेठबिगार बनवले होते. या आठ-दहा सावकारांच्या घरांवर छापे टाकायचे; त्यांच्या तिजोरीतले दस्तऐवज ताब्यात घ्यायचे, त्यांची जाहीर होळी करायची आणि 'आजपासून तुम्ही या सावकारी पाशांतून मुक्त झाला आहात' असे सगळ्या जनतेपुढे करायचे असा हा मोठा जहाल कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची सुरुवात खिरविरे गावापासून करायचे ठरले. त्याच्या पूर्वतयारीसाठी एक गुप्त बैठक झाली. बैठकीला रावसाहेबांप्रमाणेच भाऊसाहेब थोरात, मुरलीधर नवले, धर्मा पोखरकर व अकोले लाल ताऱ्याची साथ... १७३