पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या सहवासात ती आवड रावसाहेबांमध्येही संक्रमित झाली. एकदा भाऊसाहेब व रावसाहेब मुंबईला गेले होते. दुसरे एक भूमिगत कार्यकर्ते एकनाथ भागवत यांना त्यांच्या सासुरवाडीला जायचे होते व त्यांना बोरीबंदरला ट्रेनमध्ये बसवून द्यायची जबाबदारी या दोघांवर होती. ते काम झाल्यावर त्यांनी स्टेशनसमोर एका विशिष्ट जागी थांबावे अशी सूचना होती. तिथे कोणीतरी पक्षकार्यकर्ता त्यांना भेटणार होता. त्याप्रमाणे दोघे वाट पाहत उभे होते. अचानक रावसाहेबांच्या पाठीवर कोणाची तरी थाप पडली. त्यांना वाटले कोणी पोलीस आला की काय. कारण भूमिगत असताना कुठल्याही क्षणी पकडले जायची भीती असायचीच. चमकून त्यांनी वळून पाहिले, तर मागे वदूद खानांची धिप्पाड, उंचीपुरी मूर्ती ! तिघांना पक्षकामाबद्दल काही चर्चा करायची होती पण त्यासाठी सुरक्षित आणि निवांत जागा आजूबाजूला कुठे दिसेना. शेवटी वदूद खाननी समोरून येणारा एक टांगा थांबवला. तिघेही टांग्यात बसले. चर्चा सुरू झाली. व्हिटी स्टेशनवरून तिघे मरीन ड्राइव्हच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेले. मग वदूद खाननी टांगेवाल्याला पुन्हा उलट्या दिशेने जायला सांगितले. टांग्याच्या अशा दोन-तीन फेऱ्या झाल्यावर त्यांची चर्चा आटोपली. नंतरही काही वेळा रावसाहेबांच्या व वदूद खानच्या बैठकी अशा टांग्यातच व्हायच्या. भेटीसाठी अगदी सुरक्षित आणि सोयीची जागा! मे १९४९मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र प्रांत कमिटीची गुप्त बैठक झाली. सरकारने पक्षावर घातलेली बंदी त्यावेळी लागूच होती. बैठकीत रावसाहेबांच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. विशेषतः कल्याण-भिवंडी भागात त्यांनी किती मोठ्या संकटाशी सामना केला आणि शंभर- एक सशस्त्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते सहीसलामत कसे सुटले याचे खूपच कौतुक झाले. शामराव आणि गोदूताई परुळेकर आणि इतरही बरेच महत्त्वाचे पुढारी या बैठकीला हजर होते. लिन पियाओ हा माओ त्से तुंगचा एक तरुण सहकारी त्यावेळच्या कम्युनिस्ट जगामध्ये खूप प्रसिद्ध होता. गोदूताईंनी जाहीरपणे रावसाहेबांना 'भारताचे लिन पियाओ' असा किताब दिला. त्यांना पक्षाच्या महाराष्ट्र प्रांत कमिटीचे सदस्यही बनवण्यात आले. त्यावेळी त्यांचे वय फक्त २१ होते. इतक्या लहान वयात हे सदस्यत्व मिळणे हा खूप मोठा व दुर्मिळ असा सन्मान होता. आपले काम पुरेसे क्रांतिकारक नाही, ते खूप अधिक जहाल बनवायला हवे असा या बैठकीतला सर्वसाधारण निष्कर्ष होता. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्याचा दौरा करायचे परुळेकर पतिपत्नींनी ठरवले; अजुनी चालतोची वाट... १७२