पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूमिगत असताना दर तीन-चार महिन्यांतून एकदा तरी रावसाहेबांना मुंबईला जावे लागे. कारण ज्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनशी ते जोडलेले होते त्या फेडरेशनचे महाराष्ट्राचे प्रमुख वदूद खान हे मुंबईला राहत आणि त्यांना कामाचा वृत्तान्त देणे व भावी वाटचालीबाबत त्यांचे मार्गदर्शन घेणे हा पक्षशिस्तीचा एक महत्त्वाचा भाग होता. साम्यवादी चळवळीत काम करताना जी माणसे रावसाहेबांना भेटली व ज्यांचा रावसाहेबांवर खूप प्रभाव पडला अशांमध्ये वदूद खान यांचा आवर्जून समावेश करावा लागेल. मुंबईत कामगार मैदानावर भरलेल्या फीवाढविरोधी विद्यार्थी परिषदेला नगरच्या शंभर- एक विद्यार्थ्यांना घेऊन रावसाहेब गेले होते त्यावेळेपासूनच दोघांमध्ये घट्ट मैत्री जमली. रावसाहेबांचे भाऊसाहेब थोरात किंवा धर्मा पोखरकर यांसारखे जे इतर जवळचे मित्र होते त्यांच्यापेक्षा वदूद खान अगदी वेगळे होते. वदूद खान धर्माने तर मुसलमान होतेच, पण अवतीभवतीच्या इतर मुसलमानांपेक्षा खूप वेगळेही होते. त्यांची मुळेही इथली नव्हती. वदूद खान हे आज पाकिस्तानात असलेल्या पूर्व पंजाबमधले एक समृद्ध व घरंदाज पठाण. त्यांचे घराणे पतियाळाच्या नबाबाशी संबंधित होते. लहानपणी त्यांच्या घरी हत्तीही असत. अशी पार्श्वभूमी असूनही वदूद खान विद्यार्थिदशेपासूनच आधी स्वातंत्र्यलढ्याकडे आणि मग कम्युनिझमकडे आकर्षित झाले. त्यांची एक आत्या गांधीजींची अनुयायी बनली होती आणि आयुष्यभर ती गांधीजींच्या एका आश्रमातच राहिली. पंडित नेहरूंबरोबरही या कुटुंबाचा संपर्क असायचा. पुढे वदूद खान कम्युनिस्ट बनले आणि पूर्णवेळ पक्षाचेच काम करू लागले. पक्षकामामुळे त्यांचा मुक्काम मुख्यत: मुंबईतच असायचा. त्यांचे एक काका मुंबईत खार येथे राहत. त्यांच्याबरोबरच वदूद खान राहात. खूपदा रावसाहेबांना ते त्या आलिशान बंगल्यावरच सकाळी साडेसात- आठच्या सुमारास बोलवत. ती त्यांची ब्रेकफास्टची वेळ असायची. डायनिंग टेबलशी बसून जेवण्याचा रावसाहेबांच्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. आम्लेट-ब्रेड-बटर- चीज-जॅम अशाप्रकारचे पदार्थ ब्रेकफास्टला असत. स्वैपाकासाठी व वाढण्यासाठी स्वतंत्र स्टाफ असे. चहाही इंग्लिश पद्धतींचा असे. खाणे झाल्यावर हात धुण्यासाठी वॉश बेसिन, उंची साबण, शेजारी स्वच्छ शुभ्र टॉवेल, बेसिनला लागूनच बाथरूम व टॉयलेट ही सगळीच व्यवस्था उत्तम व अत्याधुनिक होती. रावसाहेबांना हा सगळा प्रकार अतिशय नवखा होता; त्यांच्या ग्रामीण राहणीपेक्षा ही जीवनशैली पूर्णत: भिन्न होती. चळवळीत काम करायचे म्हणजे कसेतरी कळकट जगायचे हे वदूद खानना नामंजूर होते. सौंदर्य, कलात्मकता आणि आधुनिक जीवनशैली यांची वदूद खानना आवड होती आणि लाल ताऱ्याची साथ... १७१