पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कहाणी सुनावली. त्यालाही आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली. रावसाहेबांच्या अंगात जागोजागी खूप काटे भरले होते. रात्री जिवावर बेतले असल्यामुळे ते फारसे जाणवले नव्हते, पण आता मात्र सगळे अंग ठणकू लागले होते. म्हाताच्याजवळ एक लाचकांड होते. त्या लाचकांडाच्या चिमट्याने त्याने बरेचसे काटे बाहेर काढले. मग आत जाऊन त्याने बिब्बा आणला आणि सगळ्या जखमांवर तापवलेले बिब्ब्याचे तेल लावले. उबेसाठी पांघरायला त्यांना एक पोते दिले. खूप मायेने त्याने ही शुश्रूषा केली. त्यामुळे रावसाहेबांना अगदी भरून आले. म्हाताऱ्याकडे शेळ्या होत्या आणि सकाळीच त्याने शेळ्यांचे दूध काढले होते. आता त्याने ते तापवले आणि रावसाहेबांना गरम गरम चहा करून दिला. चहा होता गुळाचाच पण रावसाहेबांना तो अमृतापेक्षाही गोड लागला. म्हाताच्याशी सल्लामसलत करून त्यांनी टिटवाळ्याला व पुढे ठाण्याला जायचे ठरवले व त्याचा निरोप घेऊन ते बाहेर पडले. त्यानुसार ते टिटवाळ्याला गेले, रात्री हाजीमलंगच्या डोंगरावरच्या दर्ग्यात मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी ते ठाण्याला पोचले. तिथला ५३, स्टेशन रोड हा पत्ता त्यांना चांगलाच ठाऊक होता कारण त्यांचे जवळचे स्नेही कॉम्रेड प्रभाकर बर्डे तिथे राहत. पक्षाच्या कामासाठी व मित्र म्हणूनही त्यांच्या घरी रावसाहेबांचे खूपदा जाणे-येणे असायचे. धर्मा पोखरकर पूर्वी रेशनिंग खात्यात नोकरी करत असताना वर्ष, दोन वर्षे बर्डेकडे राहातही होते. रात्रीच्या काळोखातही रावसाहेबांना ते घर सापडले. रावसाहेबांनी बेल दाबली तशी बर्डेनी दार उघडले. रावसाहेब भूमिगत आहेत हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांना दारात बघून बर्डे आश्चर्यचकित झाले. घाईघाईने रावसाहेबांना त्यांनी आत घेतले आणि मग लगेचच ते स्वतः दाराबाहेर गेले, रस्त्यावर जाऊनही थोडा वेळ थांबले - मागे कोणी पोलीस पिछा करत नाही ना ते पाहण्यासाठी. मग आत येऊन त्यांनी दार लावून घेतले आणि नंतर रावसाहेबांना घेऊन ते आतल्या खोलीत गेले. तिथे दोघे स्थानापन्न झाल्यावर मग रावसाहेबांनी आपली सगळी कहाणी त्यांना सांगितली. त्यांच्या पत्नी अॅनी या दक्षिण भारतीय होत्या, हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. बर्डेनी रात्र झाली असतानाही त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून जखमांवर लावायला कुठलेतरी मलम आणलेच. बर्डे पतिपत्नी म्हणजे एक खूप ध्येयवादी आणि प्रेमळ जोडपे होते. रात्रीचे जेवण झाल्यावरही खूप उशिरापर्यंत त्यांच्या गप्पा रंगल्या. पुढले आठ-दहा दिवस रावसाहेबांनी त्या घरात अगदी आरामात काढले. अजुनी चालतोची वाट... १७०