पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अगदी जवळपासच होते. आणि समोर सुसाट वेगाने धावणारे नदीचे पाणी. त्यांनी मनाचा हिय्या केला आणि 'लाल बावटा की जय' असे म्हणत बेधडक खाली उडी घेतली. लहानपणी पाडळी गावातल्या म्हाळुगी नदीवरच्या खोल डोहात अशीच खडकावरून उडी घ्यायचा त्यांना सराव होता. कदाचित तेच कौशल्य आणि तीच धाडसी वृत्ती आता कामी आली असावी. क्रांतीच्या अदम्य प्रेरणेतूनही हे धाडस आले असावे. कुठल्याही परिस्थितीत पोलिसांच्या हाती सापडायचे नाही ही त्यांची जिद्द होती. नदीच्या पाण्याला प्रचंड वेग होता आणि जमीन उताराची होती. पोहतानाही रावसाहेब उसळ्या मारून जास्तीत जास्त वेगाने पोहत होते. एक- दोन मिनिटांतच ते पुलापासून इतक्या दूर अंतरावर आले, की पोलीस इथे यायची सुतराम शक्यता नव्हती. नदीच्या दोन्ही बाजूंना जंगल होते, सडक अशी नव्हतीच; त्यामुळे पोलिसांच्या गाड्याही इथे यायची काहीच शक्यता नव्हती. प्रवाहाबरोबर वेगाने जाताना सुदैवाने वाटेत कुठल्या दगडावर वा झाडावर ते आदळले नाहीत; महापुरात तो धोका मोठाच होता. बऱ्याच वेळाने सपाटीचा प्रदेश आला. नदीचे पात्र आता पसरट झाले होते; पाण्याची खोलीही कमी झाली होती. अशा वेळी नदीतून बाहेर पडताना गाळात फसण्याची बरीच भीती असते. ती ध्यानात ठेवून रावसाहेबांनी किनाऱ्याचा खडकाळ असा भाग हेरला आणि ते नदीतून बाहेर पडले. चंद्रप्रकाशात जशी वाट सापडेल तसे चालू लागले. शरीर खूप थकल्यामुळे झोप अगदी अनावर झाली होती आणि तिथेच जमिनीवर ताणून द्यायचा मोह होत होता. पण सगळा जंगलाचा भाग होता आणि कोल्हेकुई व इतरही प्राण्यांचे ओरडणे लांबून कानावर येत होते. त्यामुळे तिथे झोपणेही खूप धोक्याचे होते. चालता चालता त्यांना एक खोपटे दिसले. आत एक म्हातारा आदिवासी होता. काहीतरी आधार शोधायलाच हवा म्हणून त्यांनी त्याला उठवले. आधी त्याला रावसाहेब म्हणजे एखादा चोरच वाटले. जवळच असलेला कोयता काढून तो रावसाहेबांवर धावला. कशीबशी रावसाहेबांनी त्याची समजूत काढली. त्यांना रात्रीपुरता आसरा द्यायचे त्याने कबूल केले. तिथेच म्हाताऱ्याने शेकोटी पेटवली होती. ती ऊब हवीहवीशी वाटत होती. तिथेच रावसाहेब कलंडले आणि बघता बघता त्यांचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी त्यांना जाग आली तेव्हा चांगलेच उजाडले होते. शेकोटीच्या उबेने अंगावरचे कपडे थोडेफार सुकले होते. खिशात थोड्या नोटा होत्या. त्याही ओल्या झाल्या असल्या तरी सुरक्षित होत्या. त्या त्यांनी वाळवल्या. प्राप्त परिस्थितीत त्यांचा आधार मोठाच होता. म्हातान्याला त्यांनी आपली सगळी लाल ताऱ्याची साथ... १६९