पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चांगली मांड्यांपर्यंत पोचतील एवढ्या उंचीची होती. लपण्याच्या दृष्टीने आतली जागा सुरक्षित होती. एव्हाना काळोखही चांगलाच दाटला होता. जवळचा शिधा अधूनमधून तोंडात टाकायचे आणि आवाज न करता खाण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याचवेळी डोळे आणि कान रस्त्यावरील हालचालींचा वेधही घेत होते. थोड्या वेळाने बाहेर बरीच वर्दळ सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन ट्रक भरून पोलिसांची कुमक तिथे आल्याचेही त्यांना दिसले. या शेतापर्यंत दोन पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता आणि आता एकाएकी ते दिसेनासे झाले होते; याचा अर्थ ते इथेच कुठेतरी दडी मारून बसले असणार असा तर्क त्या दोघा पोलिसांनी केला होता. आता तो सगळा परिसर पिंजून काढायचा व कुठल्याही परिस्थितीत त्यांना आज पकडायचेच या जिद्दीने त्यांनी हा भलाथोरला फौजफाटा इथे मागवला होता. आजूबाजूला हातातल्या काठ्या आपटत, ढोसत पोलीस शोध घेत होते. त्यांच्या बुटांचा खाडखाड आवाज रावसाहेबांच्या काळजाचा थरकाप उडवत होता. हे वांग्याचे शेत ज्याच्या मालकीचे होते तो म्हातारा शेतकरी बराचसा बहिरा होता. रावसाहेब इथे लपले आहेत याचा थांगपत्ता त्याने पोलिसांना लागू दिला नाही; उलट "या पाड्यावर बाहेरचा कोणीच माणूस आलेला नाही" असेच तो पुन:पुन्हा सांगत राहिला. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच दिशाभूल झाली. त्याचे ते विशिष्ट वांग्याचे शेत सोडून इतरत्रच पोलीस शोध घेत राहिले. अर्थात फार काळ आपण पोलिसांच्या दृष्टीआड राहू शकणार नाही याची रावसाहेबांना कल्पना होतीच. पोटावर सरपटत ते सडकेच्या विरुद्ध दिशेने जाऊ लागले. वांग्याचे शेत मागे पडल्यावर पुढे भाताची खाचरे होती. पाऊस नुकताच पडून गेला असल्याने जमीन ओली होती व आड येणारी कुपाटे (काट्यांची ताटी) उपटून पुढे सरकत राहणे जेमतेम शक्य होते. जरा वेळाने खाली काटे असतील या भीतीने सरपटत पुढे न जाता ते ओणव्याने पुढे जाऊ लागले. अचानक पायाला काहीतरी गिळगिळीत लागल्याने ते दचकले; खाली साप तर नसेल ना या भीतीने घाबरून उभे राहिले. पलीकडच्या बांधावर इकडेतिकडे नजर ठेवून दोन पोलीस उभे होते; त्यांनी तेवढ्यात रावसाहेबांना बघितले. आता मात्र रावसाहेबांनी जीव तोडून पळायला सुरुवात केली. सगळेच पोलीस आता त्यांच्या पाठलागावर पळू लागले. पळता पळता वाटेत एक मोठा पूल लागला. पुलाखालून एक मोठी नदी दुथडी भरून वाहत होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला चांगलाच पूर आला होता. पुलाच्या दगडी कठड्यावर चढून रावसाहेब उभे राहिले. त्यांनी मान वळवून मागे पाहिले. काही पोलीस अजुनी चालतोची वाट... १६८