पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" इथे या आंब्याच्या झाडाखाली बस. मी लगेच येतो, " असे म्हणत तो गवतवाला कुठेतरी निघून गेला. त्याने सांगितलेल्या जागी रावसाहेब बसले; तो परत यायची वाट पाहू लागले. जरा वेळाने जवळच्याच खोपटात राहणारी एक म्हातारी समोर आली. झाडाखाली परका माणूस बसलेला पाहून तिने चौकशी केली. रावसाहेबांनी तिलाही सगळे सांगितले. तो गवतवाला आपल्याला मदत करणार आहे व तो परतायची आपण वाट बघतो आहोत असेही ते म्हणाले. सगळे ऐकल्यावर त्या म्हातारीने गवतवाल्याला एक सणसणीत शिवी हासडली. तो पक्का बदमाष आहे आणि पोलिसांचा खबऱ्या आहे असे तिने सांगितले. "त्याच्यासाठी थांबू नकोस. तो उलट पोलीस घेऊन येईल आणि तुला पकडून देईल. जीव वाचवायचा असेल तर ताबडतोब इथून पळ काढ,” असाही आपुलकीचा सल्ला तिने दिला. साधारण कुठल्या रस्त्याने जावे हेही तिने सांगितले. तिचे आभार मानून रावसाहेब निघाले, तिने सांगितलेल्या दिशेने चालू लागले. दिवसभराच्या धावपळीने आणि मुख्य म्हणजे मानसिक तणावामुळे ते आता खूप थकले होते. भूकही सडकून लागली होती. रेवगडेचे घर सोडल्यापासून पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. आपल्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना कम्युनिस्ट पक्षाकडून काहीही मानधन मिळत नसे. कुठूनतरी जमलेले जेमतेम ९० रुपये त्यांच्याकडे होते. त्यातले दोन-तीन रुपये खर्च करून रस्त्यालगतच्या एका छोट्या दुकानातून त्यांनी शेगदाणे, गूळ आणि थोडेसे खोबरे खरेदी केले; थोडे खाल्ले व उरलेले अन्न जवळच्या पिशवीत बांधून ठेवले. हे तीन पदार्थ भूक भागवतात आणि चांगले पोषणही देतात हे अनुभवाने ते शिकले होते. वाड्याच्या दिशेने ते चालू लागले. त्या रस्त्याने जाणारा एखादा ट्रक वाटेत आढळेल व एकदा वाड्याला पोचल्यावर तिथून मुंबईदेखील गाठता येईल असा त्यांचा कयास होता. पण पोलीस यंत्रणा किती सुसज्ज असते आणि ताफीने आपले जाळे फेकू शकते याची त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. पोलिसांकडे प्रशिक्षित असे भरपूर मनुष्यबळ होते, त्यांचे खबरे जागोजागी पेरलेले होते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणार्धात निरोप पाठवायची वायरलेस व्यवस्थाही त्यांच्या कडे होती. रावसाहेब कुठेही गेले तरी पोलिसांपासून फार दूर जाऊ शकत नव्हते. या वाटेवरही आपल्या मागावर असलेले काही पोलीस त्यांना दिसले; जणू आराम त्यांच्या नशिबातच नव्हता. चालून - चालून दमल्यावर रस्त्यालगतच्या एका वांग्याच्या शेतात त्यांनी आश्रय घेतला; दरम्यान मागावर असलेले पोलीस पुढे निघून जातील असा त्यांनी विचार केला. लांब व जाडजूड अशा आणि निळसर रंगाच्या वांग्यांची ती जात होती. झाडेही लाल ताऱ्याची साथ... १६७