पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागले. त्या भागाची तशी त्यांना काहीच माहिती नव्हती; वाट फुटेल तसेच ते चालले होते. आता समोर खाडी लागली. पाच- एक मिनिटे ते तिथेच थांबले, खाली बसले. पण मोकळ्या रस्त्यावर असे बसून राहणे कुणाचेही लक्ष वेधून घेणारे होते. खाडी ओलांडून पलीकडे जायचे त्यांनी ठरवले. कमरेचे धोतर त्यांनी सोडले, बरोबरच्या सामानाच्या छोट्या पिशवीत ते कोंबले. डोक्यावरचा फेटाही सोडला आणि फेट्याने बांधून ती पिशवी मानेभोवती अडकवली व ते खाडीत उतरले. सुरुवातीला सगळा गाळ होता व त्यात पाय आत आत घुसत होते. समोर दलदलही बरीच होती आणि दलदलीत आपण फसू अशीही भीती वाटली. पण एकदा खाडीत शिरल्यावर आता पुढे जात राहण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. पुढे मात्र खोल पाणी लागले. त्यातून पोहत पोहत त्यांनी खाडी ओलांडली. रस्त्याच्या कडेला येऊन ते उभे राहिले. समोरून एक काळासावळा काटकुळा गृहस्थ येत होता. त्याच्याबरोबर गवताचे भारे घेतलेल्या नऊ-दहा बायका होत्या. खाडीलगत मोठाले लाकडी तराफे होते. त्यांच्या साह्याने ते भारे खाडीच्या पलीकडे न्यायची सोय असावी. पलीकडे कुठेतरी गवताचा बाजार असावा आणि तिथे नेऊन ते गवत विकायचा त्या काटकुळ्या माणसाचा धंदा असावा. गवताचा व्यापार करणारे असे त्या भागात अनेक वारली होते. इतरही दोन माणसे खाडीकडून रस्त्याच्या दिशेने येत होती. "आज खाडीच्या बाजूला लई पोलीस आलेत, काहीतरी भानगड दिसतेय,' असे ते दोघे त्या गवतवाल्याला सांगत होते. ते ऐकून रावसाहेब चरकले; धोक्यापासून आपण फार दूर नाही याची त्यांना जाणीव झाली. एवढ्यात गवतवाल्याच्या नजरेस पडले. ते स्थानिक नाहीत, परक्या मुलुखातून आले आहेत हे उघडच दिसत होते. "कोण तू? कुठून आलास? इथे काय काम आहे ?" वगैरे गवतवाल्याने सुरू केली. " >> खोटे काहीतरी बोललो तर आपण अडचणीत येऊ, त्यापेक्षा ह्याला विश्वासात घेऊन सगळे सांगावे, कदाचित तो आपल्याला मदत करेल असा विचार रावसाहेबांनी केला. गवतवाल्याला सगळे सांगितले. आपण गोदूताई परुळेकरांचे म्हणजेच वारल्यांच्या राणीचे मदतनीस आहोत हेही सांगितले. तो गवतवाला वारलीच दिसत होता आणि वारली लोक गोदूताईंना खूप मानत असल्यामुळे तो गवतवालाही आपल्याला मदत करेल असे त्यांना वाटले. "मला मुंबईकडे जाणाऱ्या एखाद्या गाडीत बसवून दे,” अशी त्यांनी विनंती केली. त्यासाठी गवतवाल्याला त्यांनी थोडे पैसेही देऊ केले. मुंबईला पोचलो की तिथल्या गर्दीत आपण सुरक्षित असू असा त्यांचा कयास होता. अजुनी चालतोची वाट... १६६