पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामतांनी गोदूताई परुळेकर यांच्यासाठी काही औषधेही रावसाहेबांकडे दिली. गोदूताई त्यावेळी आजारी होत्या व शामरावांबरोबर नाशिकमध्ये होत्या. दोघेही भूमिगत होते. नाशिकला त्यांच्यापर्यंत ही औषधे पोचवायची जबाबदारी रावसाहेबांवर सोपवली गेली. त्यानुसार ते पुण्याला गाडीत बसले. कल्याणला ही गाडी बदलायची आणि तिथून पुढे नाशिकला जायचे असे त्यांनी ठरवले होते. दुर्दैवाने कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे असताना एका साध्या वेषातल्या पोलिसाने त्यांना ओळखले. ही गोष्ट रावसाहेबांच्याही लक्षात आली. त्याला चुकवण्यासाठी ते प्लॅटफॉर्म सोडून कल्याण गावात शिरले. गल्लीबोळांतून फिरू लागले. वाटेत योगायोगाने त्यांचे एक बालमित्र भाऊ पाटील रेवगडे यांचे घर लागले. पटकन रावसाहेब त्या घरात शिरले. मघाचा पोलीस आता कुठेच दिसत नव्हता. त्याला दिलेली हुलकावणी बहुधा यशस्वी झाली होती. अचानक भेटलेल्या मित्राला पाहून रेवगडेंना खूपच आनंद झाला. त्यांनी चांगले आदरातिथ्य केले. रात्रीचा मुक्कामही त्याच घरी झाला. त्यांच्याच सल्ल्याने पुढचा प्रवास आगगाडीने न करता बसने करायचे रावसाहेबांनी ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राने त्यांना नाशिकला जाणान्या बसमध्ये बसवूनही दिले. सुरक्षेच्या दृष्टीने कल्याणच्या मुख्य डेपोतून बस न पकडता मधल्याच एका नाक्यावर त्यांनी ही बस पकडली होती. बस भिवंडीच्या दिशेने जाऊ लागली. जरा वेळाने रावसाहेबांच्या लक्षात आले, की बसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले दोघे जण त्यांच्याकडे बघत होते आणि एकमेकांना काहीतरी खुणावत होते. ते दोघे पोलीस आहेत असा त्यांना संशय आला. भिवंडी स्टॉपवर बस थांबली. स्टॉपला लागूनच पोलीस स्टेशन दिसत होते. बसमधून उतरून ते दोघे आता पोलीस स्टेशनकडे जाताना दिसले. ते पोलीसच आहेत याविषयी आता रावसाहेबांची खात्री पटली. भूमिगत कम्युनिस्टांकडे रिवॉल्व्हर असते अशी बहुधा पोलिसांची समजूत असावी व म्हणूनच रावसाहेबांना पकडताना बरोबर सशस्त्र पोलीस हवेत असेच त्यांना वाटले असणार व त्याचीच तजवीज करायला ते बहुधा पोलीस स्टेशनकडे जात होते. जाताना बस ड्रायव्हरच्या कानात त्यांनी काहीतरी सांगितले. 'आम्ही येईस्तोवर बस सोडू नकोस' असेच ते बहुधा असावे. रावसाहेब बसमध्येच बसलेले होते आणि खिडकीतून बाहेरच्या सगळ्या हालचाली पाहत होते; यातून कसा मार्ग काढायचा याचा अंदाज घेत होते. बराच वेळ बस सुटेना. एका छोट्या स्टॉपवर बस इतका वेळ थांबावी हेही आश्चर्यच होते. बसमध्येच थांबण्यात धोका आहे हे आता त्यांच्या लक्षात आले. बस सोडून ते उतरले आणि रस्ता ओलांडून पोलीस ठाण्यापासून दूर जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊ लाल ताऱ्याची साथ... १६५