पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिसू लागला; काहीतरी डाव रचण्यासाठीच तर तो मघाशी निघून गेला नसेल ना, या शंकेची पाल मनात चुकचुकू लागली. सरसावून ते उठले आणि आसपासची टेहळणी करू लागले. खाली मुंबई- आग्रा रोड होता. लेण्यांकडे येणारा छोटा रस्ता मुख्य रस्त्यालाच एका वळणावरून फुटला होता. त्या वळणावर पोलिसांच्या तीन मोठ्या गाड्या उभ्या होत्या व आतून सशस्त्र पोलीस खाली उतरत होते. ते दृश्य बघताच रावसाहेब एकदम सावध झाले. "पोलीस आले, चला पळा," असे म्हणत त्यांनी सगळ्यांना उठवले. सगळेच ताडकन उठले. डोंगराच्या पश्चिमेच्या बाजूने पोलीस वर येत होते. त्यांच्या तावडीतून सुटायचे असेल तर पूर्वेच्या बाजूने डोंगर उतरायचे, खालच्या शेताडांतून भगूर गाठायचे आणि पुढे देवळाली कँपला जायचे हाच एक मार्ग होता. शिवाय पोलीस सशस्त्र आहेत, ते आपला पाठलाग करणारच; त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांच्या टप्प्यापलीकडेच आपण राहिले पाहिजे ह्याचीही जाणीव होतीच. कार्यकर्त्यांनी एकूण आढावा घेतला आणि लगेच जिवाच्या आकांताने पायवाटही नसलेला डोंगर ते धावत पलीकडच्या बाजूने उतरू लागले. पोलिसांना अर्थातच त्यांचा पत्ता लागणे शक्य नव्हते, कारण ते पश्चिमेच्या बाजूने डोंगर चढत होते. आपण सुरक्षित अंतरावर येऊन पोचलो आहोत, आता पोलिसांपासून धोका नाही याची खात्री पटल्यावर कार्यकर्ते धावायचे थांबले. धापा टाकत काही क्षण विसावले. आपण कुठे आहोत याचा अंदाज घेतल्यावर रावसाहेबांच्या लक्षात आले, की इथे शेजारीच विंचुरी दळवी गाव आहे व याच गावी आपली आतेबहीण सोन्याबाई राहते. साथीदारांसह ते तिच्या घरी गेले. तिला अर्थातच रावसाहेबांच्या कम्युनिस्ट क्रांतीबद्दल किंवा ते भूमिगत असल्याबद्दल काहीही ठाऊक नव्हते; ती बिचारी एक साधी, खेडवळ शेतकरी भगिनी होती. पण रावसाहेबांची व त्यांच्या सर्व मित्रांची जेवायची व झोपायची सोय तिने खूप प्रेमाने केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळे पुढच्या वाटेला लागले. एका मोठ्या संकटातून ते कसेबसे सहीसलामत सुटले होते. पण पोलिसांचा ससेमिरा चुकवणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत चालले होते. १९४८ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमधली गोष्ट. नगर व नाशिक जिल्ह्यांतील कामाच्या माहितीचे सर्व वृत्तान्त घेऊन पुण्याला जायची आणि पक्षाचे एक समर्थक प्रोफेसर अ. रा. कामत यांना भेटायची सूचना रावसाहेबांना मिळाली. त्याप्रमाणे ते पुण्याला जाऊन कामत यांना भेटले. सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा भेटी नेहमीच्या जागा सोडून इतरत्रच होत. सर्व भूमिगतांनी टोपणनावेही धारण केली होती; खऱ्या नावांचा उल्लेख सहसा होत नसे. कामकाजाची सर्व माहिती घेतल्यानंतर अजुनी चालतोची वाट... १६४