पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असायची. पुढे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जे आंदोलन उभे राहिले त्यात रावसाहेब आणि यादवराव आढाव आघाडीवर होते. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या कामकाजातही यादवरावांचा महत्त्वाचा सहभाग असायचा. भूमिगत असताना मागावर असलेल्या पोलिसांना अनेकदा हुलकावणी द्यावी लागे. समयसूचकता आणि चपळाई यांची अशावेळी कसोटी लागे. उदाहरणार्थ, पांडवलेण्याचा प्रसंग. नाशिक जिल्ह्यातील सगळ्या कार्यकर्त्यांची एक बैठक रावसाहेबांनी नाशिकमध्ये वाघगुरुजींच्या मदतीने भरवली होती. त्यांचे नेते आठरे पाटीलही मुख्य मार्गदर्शनासाठी हजर होते. रात्रभर ती बैठक चालली. बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातलेही आठ-दहा कार्यकर्ते हजर होते. दुस-या दिवशी दुपारी त्यांची एक स्वतंत्र बैठक वाडीवऱ्हे येथे घ्यायची व त्यांनी पुढल्या रात्रीचा मुक्कामही वाडीवऱ्हे येथेच करायचा असे ठरले होते. त्यानुसार नाशिकहून भल्या सकाळी नगरचे कार्यकर्ते निघाले. संपूर्ण प्रवास हा पायीच करायचा होता. विश्रांतीसाठी सर्वांनी पांडवलेण्याला थांबावे, लेणी पाहावीत, तिथेच एखाद्या झाडाखाली आडोशाला थांबून जेवावे व मग वाडीवऱ्हेला जावे असे नियोजन होते. त्यांच्यासाठी भाकया भाजून मराठा बोर्डिंगच्या बैलगाडीतून वाघगुरुजींनी पाठवून दिल्या. दुर्दैवाने पोलिसांना याचा सुगावा लागला. वाघगुरुजींच्या आणि मराठा बोर्डिंगच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. बैलगाडीवाल्याकडून पोलिसांनी सगळी माहिती काढली आणि कार्यकर्ते पोचायच्या आधीच सी. आय. डी. चा एक माणूस पांडवलेण्याला येऊन दाखल झाला. कार्यकर्त्यांचा गट एकच असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक जण स्वतंत्रच चालत असे. हे नेमके किती लोक आहेत याचा सी. आय. डी. च्या माणसाला अंदाज नव्हता; पण रावसाहेबांवर व इतर दोघा तिघांवर तो अगदी गुपचूप, डोळ्यांत तेल घालून नजर ठेवून होता त्यांच्याबरोबरच तोही लेणी पाहत फिरत होता; म्हणजे तसे नाटक करत होता. हा माणूस आपल्यावर पाळत ठेवून आहे हे रावसाहेबांच्या लक्षात आले होते. तेही त्याच्यावर पाळत ठेवून होते. पण अर्ध्या - एक तासाने तो सी. आय. डी. तिथून साळसूदपणे निघून गेला. तो दिसेनासा झाल्याचे लक्षात आल्यानंतर मग रावसाहेबही निश्चित झाले. सगळ्यांनी जेवून घेतले. झाडांची सावली दाट होती. लेणी डोंगरावर असल्याने वाराही छान वाहत होता. पहाटेपासूनच्या चालण्यामुळे आणि मुख्य म्हणजे रात्रीच्या जागरणामुळे कार्यकर्ते खूप दमले होते व बघताबघता त्यांना शांत झोप लागली. पण रावसाहेबांचा डोळा लागेना. मघाचा तो सी. आय. डी. सारखा डोळ्यांपुढे लाल ताऱ्याची साथ... १६३