पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाशिकमध्ये एक छोटासा छापखाना सुरू करायचा आणि प्रचाराची पत्रके वगैरे तिथे छापायची अशी जबाबदारी पक्षाने रावसाहेबांवर सोपवली. बेचाळीसच्या आंदोलनात माहितीपत्रक (न्यूजलेटर) काढण्यासाठी अशी व्यवस्था पाडळी गावातच केली गेली होती व प्रत्यक्ष माहितीपत्रक काढण्याचे काम तेव्हा भूमिगत असलेले भास्करराव दुर्वे करत. तो सगळा सेटअप रावसाहेबांच्या माहितीचा होता. कम्युनिस्ट पक्षाचा व्याप बराच वाढला होता, प्रचारपत्रकांची गरजही मोठ्या संख्येने असे व त्यामुळे आता सायक्लोस्टायलिंगऐवजी प्रत्यक्ष प्रिंटिंगची व्यवस्था करायची होती. छापखान्यासाठी जागाही राजाराम पाटील यांनीच मिळवून दिली. गुलजार बंगल्यापासून एकदोन मैलच दूर असलेल्या संसारी नावाच्या लहानशा गावाच्या शिवारात त्यांच्या एका नातेवाइकाचे रिकामे घर होते. तिथेच रावसाहेबांनी हा छापखाना सुरू केला. हे घर म्हणजे प्रशस्त दोन मजली कौलारू माडी होती व ती गावापासून काहीशा अलग पडलेल्या शिवारात होती. त्यामुळे माणसांची फारशी वर्दळ नसे व त्याचबरोबर गुलजार बंगल्यातून इथे पायी जा-ये करणेही अवघड नव्हते. काम गुप्तपणे करायचे असल्यामुळे कोणी कामगार नोकरीला ठेवणे शक्य नव्हते. म्हणून मग प्रत्यक्ष छपाईकामाची सगळी जबाबदारी त्यांनी व आढाव या आपल्या मित्रावर सोपवली. यादवरावांनीही ती अतिशय कष्टपूर्वक व चांगल्या प्रकारे पार पाडली. यादवराव आढाव स्वतः कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते व कोपरगाव येथे असलेल्या त्यांच्या बंधूंच्या छापखान्यात ते काम करत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कागद आणणे, ते योग्य त्या आकारात कापून घेणे, खिळे जुळवून मजकूर तयार करणे, तो मशीनवर चढवून छपाई करणे, पुढे कागदाच्या घड्या घालणे, बांधणी करणे वगैरे सगळी खडान्खडा ठाऊक होती. तेच ज्ञान व अनुभव वापरून त्यांनी पक्षासाठीचा हा छापखाना सुरू केला आणि उत्तम चालवला. त्यासाठी ते सतत कोपरगावहून ये-जा करत राहिले. पक्षाची एक मोठी गरज त्यातून भागली. रावसाहेबांप्रमाणेच पुढे यादवरावही श्रीरामपुरातच कायमसाठी स्थायिक झाले. श्रीरामपुरातील अगदी मोक्याच्या जागी, म्हणजे टेकावडे बिल्डिंगसमोर, त्यांनी आपला रामदास प्रिंटिंग प्रेस हा छापखाना थाटला, तो नावारूपाला आणला. आपल्या लग्नानंतरची आठ वर्षे रावसाहेबही टेकावडे बिल्डिंगीतच राहत व त्यामुळे दोघांचा वरचेवर संबंध येत राहिला. छापखाना मोक्याच्या जागी असल्यामुळे ग्रामीण भागातून श्रीरामपुरात येणाऱ्या पुढाऱ्यांची पहिली बैठक यादवरावांकडेच अजुनी चालतोची वाट... १६२