पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरकारी दडपशाहीदेखील वाढत गेली. वाडीवऱ्हे गावातील राजाराम पाटील यांचे मळ्यातले घर हे इतके दिवस रावसाहेबांचे आश्रयस्थान होते. तसे दौरे सारखे चालतच होते, पण कितीही भटकंती केली तरी काही दिवसांनंतर वाडीवऱ्हेच्या बेस कँपवर येणे व्हायचेच. इथे रावसाहेबांनी पक्षकार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठकही घेतली होती. पण आता वाडीवऱ्हेमधला मुक्काम धोक्याचा बनला होता. त्यामुळे राजाराम पाटलांनीच पुढाकार घेऊन त्यांची राहण्याची सोय देवळाली कँपमधल्या एका बंगल्यात केली. नाशिकजवळचे देवळाली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. इथल्या कँप रोड या भागात मुंबईच्या अनेक पारशी व गुजराती व्यापाऱ्यांचे अतिशय सुंदर व प्रशस्त असे बंगले होते. हे व्यापारी फक्त हवापालटासाठी काही दिवस इथे येत; एरवी हे बंगले बंदच असत. बंगल्याची व्यवस्था पाहायला एखादा माळी ठेवलेला असे. बंगल्याच्या आवारातच त्याच्या राहण्यासाठी आउटहाऊससारखी एखादी खोलीही बांधून दिलेली असे. हे माळी तसे खूप इमानी असत आणि मालकाच्या अनुपस्थितीत बंगल्याची सगळी व्यवस्था चांगली सांभाळत. गुलजार बंगला हा यांतलाच एक विशेष देखणा असा बंगला. पंडित नेहरूही काही दिवस या बंगल्यात राहून गेले होते असे सांगितले जाई. मुंबईला राहणारे त्याचे गुजराती मालक वर्षातून दोन-तीनदाच तिथे येत. राजाराम पाटलांचे कदम नावाचे एक मामा याच बंगल्यात माळी म्हणून नोकरीला होते. या बंगल्याला चारी बाजूंनी उंच भिंतीचे कंपाउंड होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आतले काहीच दिसणे शक्य नव्हते. त्यामुळे लपून राहण्यासाठी ही जागा उत्तम होती. कदममामा, मामी व त्यांच्या लहान मुलांकरिता बंगल्याच्या आवारातच एक आउटहाउस होते. प्रत्यक्ष बंगल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप असायचे पण रावसाहेबांना आपल्या कुटुंबाबरोबरच काही महिन्यांसाठी ठेवून घ्यायला कदममामा तयार झाले. अर्थात याचे श्रेय राजाराम पाटलांनाच होते. तसे पाहिले तर कदममामा स्वतः खूप गरीबच होते. माळ्याचा पगार तो कितीसा असणार! शिवाय पदरी पाच-सहा मुले. त्यातून कम्युनिस्ट किंवा अन्य कुठल्याच चळवळीशी त्यांचा काही संबंधही नव्हता. पण तरीही त्यांनी रावसाहेबांना खूप प्रेमाने सांभाळले; आपल्यातीलच चटणीभाकर त्यांनाही वाढली. केवळ माणुसकीच्या नात्याने मोलाची मदत करणारी अशीच इतरही काही माणसे भूमिगत असताना रावसाहेबांना भेटली आणि आता इतक्या वर्षांनंतरसुद्धा रावसाहेब त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढतात. लाल ताऱ्याची साथ... १६१