पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या लक्षात आले की गावांमध्ये इतक्या लोकांच्या जेवणाचीही सोय होणे खूप अवघड होते. त्यामुळे मग त्यांनी दोन-तीन जणांच्या गटांमधून फिरायला सुरुवात केली. पण एकूण तो सगळाच उन्हाळा अतिशय कष्टाचा गेला. एक कालखंड तर असा आला, की सलग तीन आठवडे रावसाहेबांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अंघोळही करता आली नाही किंवा कपडेही धुता आले नाहीत. तीन आठवड्यांनंतर गावाबाहेरच्या एका डोहावर त्यांना अंघोळ करता आली व कपडे धुता आले. त्यांच्या कपड्यांवर खूपच उवा झाल्या होत्या. खडकांवर पसरून त्यांनी कडक उन्हात खूप वेळ कपडे वाळवले तेव्हा कुठे त्या उवा मेल्या. सुरुवातीच्या काळात बेज या तुलनेने मोठ्या गावी रावसाहेबांनी एक शेतकरी परिषदही घेतली. सदाशिव पाटील या टोपण नावाने ते या परिषदेत वावरले. त्या कामात कारभारी रंभाजी ऊर्फ वाघगुरुजी, अॅड. दौलतराव घुमरे व कॉ. टी. एस. पाटील यांचा मोलाचा पुढाकार होता. तसा त्यांचा पूर्वपरिचय होताच. पूर्वी बरीच वर्षे वाघगुरुजी नाशिकच्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये व्यवस्थापक होते. भाऊसाहेब थोरात त्याच बोर्डिंगमध्ये राहत व नाशिकला शिकायला असताना रविवारच्या 'फीस्ट'साठी रावसाहेब खूपदा बोर्डिंगमध्ये जात. तिथेच वाघगुरुजींचा व रावसाहेबांचा परिचय झाला होता. पुढे व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यामुळे वाघगुरुजींनी वसतिगृह सोडले होते व सध्या ते कम्युनिस्ट पक्षाचेच पूर्णवेळ काम करत होते. त्यांना दीर्घ आयुष्य लाभले; ते अगदी शतायुषी झाले. आयुष्यभर त्यांनी पक्षाचेच काम केले. एक उत्तम शिक्षक म्हणूनही त्यांचा लौकिक होता आणि त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे मोठमोठ्या हुद्द्यांवर पोचले. कम्युनिस्ट चळवळीत वाघगुरुजींना तुरुंगवास झाला व त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचे पैशाअभावी खूप हाल होऊ लागले. अशावेळी त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या पत्नीला मनीऑर्डरने पाठवत असत. वाघगुरुजींना साहेबांविषयी खूप आपुलकी होती; वाघगुरुजी त्यांना 'सरकार' म्हणून संबोधत. पाळे व बेज ही दोन गावे भूमिगत कम्युनिस्ट चळवळीची मोठी केंद्रे बनली होती. वाघगुरुजींना मानणारी अनेक माणसे त्या भागात होती व बेजमधली शेतकरी परिषद आयोजित करताना त्या ओळखींचा खूप उपयोग झाला. दौलतराव घुमरे हे नाशिकचे हरहुन्नरी व हुशार विद्यार्थी-कार्यकर्ते. ते त्यावेळी वाघगुरुजींबरोबर असत. बेज परिषदेसाठी त्यांनीही खूप कष्ट घेतले. चळवळीत तुरुंगवासही भोगला. पुढे ते नाशिकमधले एक विख्यात वकील बनले व वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत त्यांचा सदैव सहभाग असतो. जसजशा कम्युनिस्ट कारवाया अधिकाधिक हिंसक बनत गेल्या तसतशी अजुनी चालतोची वाट... १६०