पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्हती. एक- दोनदा तर तो पोलीस रावसाहेबांबरोबर पत्तेही खेळला होता; पण कोणालाच रावसाहेबांबद्दल कधी कसला संशय आला नव्हता. एकदा गावातल्या एका पोलीस चौकीजवळ सरकारतर्फे दोन-चार पोस्टर्स चिकटवली गेली. त्यात 'फरारी इसम' म्हणून रावसाहेबांचे नाव-पत्ता व विशेष म्हणजे त्यांचा फोटोही होता. 'हा इसम फरारी असून त्याला पकडून देणाऱ्या सरकारतर्फे रुपये दहा हजार इनाम दिले जाईल' असा मजकूर त्यात होता. ते पोस्टर पाहताच 'हा पाहुणा राजाराम पाटलांच्या घरी खूपदा येतो जातो' अशी चर्चा संबंधितांमध्ये सुरू झाली. पोलिसांनी ही राजाराम पाटलांकडे चौकशी केली पण पाटलांनी कानावर होत ठेवले. राजाराम पाटलांचे पोलिसांबरोबर चांगले संबंध होते, त्यामुळे मग पोलिसांनीही खूप खोलात जाऊन या प्रकरणाची चौकशी केली नाही. पण यानंतर गावात मोकळेपणे फिरणे मात्र रावसाहेबांना अशक्य झाले. आठ-दहा दिवसांत रावसाहेबांच्या लक्षात आले, की त्यांच्यावर दहा हजार रुपयांचे इनाम लावले असल्याची बातमी पोस्टर्सद्वारे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात सगळीकडे पसरली होती. "ऐका हो, ऐका! रावसाहेब पांडुरंग शिंदे, राहणार पाडळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, हा इसम फरारी असून त्याला जिवंत अथवा मृत पकडून देणान्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस सरकारकडून देण्यात येणार आहे होऽ ऽ होऽ ऽ” अशी दवंडी गावोगाव गावचे येसकर वा जागल्या द्यायचे. कधीकधी मोठी गंमत व्हायची. रावसाहेब, धर्मा व इतर काही भूमिगत मित्र गावात एखाद्या घरी आश्रयाला असतानाच रस्त्यावर पिटली जाणारी ती दवंडी त्यांच्याही कानी पडे व मग हसताहसता त्यांची मुरकुंडी वळे. नाशिक जिल्ह्यात कामाची सुरुवात करताना रावसाहेबांनी इगतपुरी तालुक्यापासून सुरुवात केली. वाडीवऱ्हे हे गावदेखील इगतपुरी तालुक्यातच होते. या भागात आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. प्रत्येकाच्याच घरी अठराविश्वे दारिद्र्य. कधीकधी नुसतेच कांदे खाऊन भूक मारावी लागे. ते मे महिन्याचे दिवस होते. नद्या-नाले पूर्ण कोरडे पडलेले. बहुतेक गावांमध्ये प्यायलाही पाणी नसायचे; जे थोडेफार पाणी असायचे तेही कमालीचे अस्वच्छ असायचे. गावोगावी प्रचारसभा घेत रावसाहेब फिरत होते व अस्वच्छ पाण्यामुळे प्रत्येक गावात त्यांना नारूचे रोगी आढळले. त्याच सुमारास या भागात कॉ. पुंजाबाबा गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली भाताच्या भाववाढीची न भूतो न भविष्यति अशी चळवळ चालू होती. या चळवळीतही रावसाहेब व त्यांचे सहकारी सहभागी झाले. त्याशिवाय कॉ. मुरलीधर नवले व इतर अकोले येथील सहकाऱ्यांनाही त्यांनी सहभागी करून घेतले. सुरुवातीला रावसाहेबांबरोबर दहा-बारा कार्यकर्ते असत, पण मग पुढे लाल ताऱ्याची साथ... १५९