पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चपापून सावध झाले. तेवढ्यात 'पॉवेल' हा शब्द कानावर आला. गुहा येथील प्रशिक्षण शिबिरातील ती त्यांची मित्रत्व दाखवणारी सांकेतिक खूण होती. रावसाहेबांनी आवाजही ओळखला; तो धर्मा पोखरकरांचा होता. ठाकूरभाई व रावसाहेब टेकडीवर लपले असताना बाकी कार्यकर्ते पुन्हा एकत्र जमले होते कारण आसपास पोलीस नाहीत याबद्दल आता सर्वांची खात्री पटली होती. पण त्यांचे प्रमुख आठरे पाटील तिथे आले नव्हते; ते कुठे आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यांना शोधण्यासाठी म्हणून धर्मा बाहेर पडले होते, झाडाझुडपांतून भटकत होते. आपण पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून अंगावरचे कपडे त्यांनी काढून एका मित्राकडे दिले होते व ते फक्त लंगोट घालून फिरत होते. पुढे आठरे पाटीलही सगळ्यांना वाशेरे गावातच सापडले. ओढ्याच्या एका घळईत काही झुडपांच्या आड ते लपले होते, तेवढ्यात पलीकडच्या झाडीतून अंधारात किलकिले करणारे, चमकणारे डोळे त्यांना दिसले. बारीक नजरेने पाहिल्यावर कळले की तो वाघच आहे! वाघाने खाऊन मरण्यापेक्षा पोलिसांनी पकडलेले परवडले म्हणून ते जीव घेऊन तिथून पळत सुटले होते आणि थेट गावात आले होते. एव्हाना रात्र बरीच झाली होती आणि गावात सगळी सामसूम होती. आता पोलीस यायची शक्यता फारच कमी होती. वातावरणातला ताणही त्यामुळे निवळला होता. गावातले कार्यकर्ते आणि भूमिगत कार्यकर्ते मिळून शंभरएक जण तिथे होते. गावकऱ्यांनी पुरणपोळीचा बेत केला होता. गप्पा मारत सगळे निवांत जेवले आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा आपापल्या वाटेने रवाना झाले. कुठल्या भूमिगत कार्यकर्त्यांनी कुठले काम करायचे याची एक सर्वसाधारण वाटणी पक्षाने करून दिली होती. रावसाहेबांकडे विद्यार्थी-फ्रंट आणि नाशिक जिल्हा ही कामे सोपवण्यात आली होती. धर्मा पोखरकर आणि नारायण नेहे हे त्यांना मदतनीस म्हणून देण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात त्यांचे बरेच वास्तव्य असे. या जिल्ह्यात वाडीवऱ्हे या गावी राजाराम पाटील मालुंजकर नावाचे रावसाहेबांचे एक नातेवाईक होते. त्यांची बरीच शेतीवाडी होती, गावात मोठे घर होते. रावसाहेबांचा मुक्काम खूपदा तिथे असे. राजाराम पाटलांनी घरातल्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या व तिथला एक भाडेकरू तर पोलीसच होता. रावसाहेबांनी त्यावेळी सदाशिव पाटील हे टोपणनाव धारण केले होते. पोलिसाला वा अन्य कुठल्या भाडेकरूंना त्यांचे खरे नाव माहीत असण्याची काहीच शक्यता अजुनी चालतोची वाट... १५८