पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती. गावापासून लांब एका डोंगराजवळून ओढा वाहत असे. ओढ्यालगत आंब्याचे एक भलेमोठे झाड होते. झाडाच्या सावलीत एका खोलगट जागेत सगळे बसले. चारी बाजूंनी झाडी असल्यामुळे ही जागा तशी सुरक्षित होती. दुपारी एक वाजता बैठक सुरू झाली. आठरे पाटील हे अहमदनगर भागातले कम्युनिस्टांचे प्रमुख नेते. तेच अध्यक्षस्थानी होते. चारच्या सुमारास काही स्वयंसेवकांनी तिथेच दगडांची चूल पेटवून सगळ्यांसाठी चहा केला. पितळेच्या भांड्यांतून तो एकेक करत प्रत्येकाला दिला जात होता. एकीकडे बैठक चालूच होती. त्यावेळी रावसाहेब व धर्मा यांच्यात काहीतरी विनोद घडला व त्यामुळे रावसाहेब हसले. नेमक्या त्याचवेळी आठरे पाटील काहीतरी गंभीर मुद्दा मांडत होते ते या हसण्यामुळे एकदम संतापले. गंभीर चर्चा चालू असताना एखाद्या कार्यकर्त्याने असे मध्येच हसणे यात त्यांना औचित्यभंग आणि शिस्तभंग झाल्यासारखे वाटले. लगेच त्यांनी सगळ्यांसमोर रावसाहेबांना झापले आणि म्हणाले, "आपण क्रांतिकारक आहोत. असला थिल्लरपणा आपल्याला शोभत नाही. आता शिक्षा म्हणून चहाचे ते भांडे तू तुझ्या हातावर ठेव." चहाचे ते पितळी भांडे खालून खूपच तापलेले होते, पण तरीही मनाचा हिय्या करून रावसाहेबांनी हाताचा कोपरापुढला भाग उघडा केला आणि त्यावर ते चहाचे भांडे ठेवले. आठरे पाटलांना वाटले होते, की रावसाहेब ते गरम भांडे हातावर ठेवणार नाहीत आणि ठेवले तरी चटका बसल्याबसल्या लगेच हात बाजूला करतील. पण जराही न कचरता रावसाहेब तो चटका सहन करत राहिले. सगळे जण अवाक् होऊन ते दृश्य बघत होते. हात चांगलाच पोळल्यामुळे रावसाहेबांच्या हातावर मोठा फोड आला व त्याची खूण नंतर खूप दिवस राहिली होती. आपली चूक झाली हे नंतर आठरे पाटलांनी कबूल केले पण तत्कालीन कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत वातावरण, वरिष्ठांची दहशत आणि कठोर पक्षशिस्त यांची एक झलक या प्रसंगातून दिसते. ही बैठक चालू असताना मध्येच गावातून व बाजूच्या रस्त्यावरून मोठमोठ्या दिव्यांचा प्रकाश मधूनमधून दिसू लागला. या परिसरात पोलिसांच्या गाड्या फिरत असल्याची शक्यता गावातून आलेल्या कोणा कार्यकर्त्यांने व्यक्त केली. त्यामुळे मग बैठक आटोपती घेतली गेली आणि सगळे जण आसपासच्या भागात आसऱ्यासाठी पांगले. ठाकूरभाई नावाच्या एका बलदंड कार्यकर्त्याबरोबर रावसाहेब टेकडीवर एका आडोशाला जाऊन लपले. बराच वेळ काहीच घडले नाही. एव्हाना अंधारही दाटून आला होता. अचानक ओढ्याजवळ काही हालचाल होत असल्याचा आवाज आला. ओढ्याच्या खोल घळईतून एकदम उघडी आणि फक्त लंगोट नेसलेली एक आकृती टेकडीच्या दिशेने वर येताना त्यांना दिसली. दोघेही एकदम लाल ताऱ्याची साथ... १५७