पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जखमी झाले. त्या सगळ्यांचं तुम्हांला काहीच सोयरसुतक नाही. तुमचा मुलगा नुसता पावसात भिजला तर त्याचं मात्र तुम्हांला इतकं दुःख होतं आहे !" दादांना बिचाऱ्यांना काय बोलावे हेच सुचेना; संकटात सापडलेल्या मुलाची प्रेमाने चौकशी करण्यात आपली काय चूक झाली, हेच त्यांना उलगडेना. खरे तर दादांनी गेल्या आठ-दहा वर्षांत खूप काही भोगले होते. थोरले पाटीलभाऊ आपल्या मर्जीनुसारच वागत; दादांबरोबर त्यांचे फारसे कधीच जुळले नाही; प्रापंचिक अडचणींना तोंड देताना दादांना त्यांचा कधीच आधार वाटला नाही. मधले अण्णाभाऊ कम्युनिस्ट सहकाऱ्यांबरोबर येरवडा जेलमध्ये होते. आणि धाकटे रावसाहेबही त्याच चळवळीमुळे फरारी होते. दोन मुले वाया गेली, कमावणारे कोणीच नाही म्हणून नातेवाईक व शेजारीपाजारी हिणवत. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची पाटीलकी गेली होती, जवळची बंदूकही जप्त झाली होती. पोलिसांचे सतत पडणारे छापे आणि झडत्या यांचाही त्रास खूप होत होता. मोठा मुलगा व तीन मोठ्या मुलींच्या लग्नांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी सावकाराकडून वेळोवेळी शेती गहाण ठेवून कर्ज काढावे लागले; ते फेडता न आल्याने एक शेत सावकाराकडेच गेले. त्यामुळे गावात भरपूर मानहानी झाली. पण कुठलीही तक्रार न करता मुळचे खूप मानी असलेले दादा हे सारे गुपचूप सहन करत आले होते. आणि आता त्याच दादांना रावसाहेब हे सगळे ऐकवत होते. रावसाहेब म्हणतात, "दादांबरोबरच्या माझ्या त्यावेळच्या अशा वागण्यात केवढी हृदयशून्यता होती ! कम्युनिस्ट पक्ष आम्हांला कोणत्या दिशेने नेत होता, याचा विचार आज मनाला पडतो आणि मन पश्चात्तापदग्ध होते. ' }} एवढे बोलणे ऐकूनही दादांनी घाईघाईने टोकरीत शेगडी पेटवली. रावसाहेबांनी कपडे बदलले, शेगडीवर अंग शेकवले. बाईंनी चूल पेटवली. शेजारून त्यांच्या जाऊ (जिजी) मदतीला आल्या. एवढ्या रात्री दोघींनी स्वयंपाक केला, रावसाहेबांना जेवू घातले. दगडांवरून चालल्यामुळे रावसाहेबांचे पाय जागोजागी सोलवटले होते, कारण चालताना पायातल्या चपला केव्हाच पाण्याबरोबर वाहून गेल्या होत्या. बाईंनी त्यांच्या तळपायाला खोबरेल तेल लावले व काशाच्या वाटीने पाय चोळून दिले. त्यामुळे आणि पोटभर जेवण झाल्यामुळे मग रावसाहेबांना झोप लागली. पण सवयीनुसार त्यांना पहाटेच जाग आली. घाईघाईने सगळे आवरून ते काळोखातच घराबाहेर पडले. त्यांचा पुढला मुक्काम वाशेरे गावाजवळ होता. अकोले तालुक्यातील वाशेरे हे गाव बरेचसे कम्युनिस्ट प्रभावाखाली होते. तिथे त्या दिवशी संगमनेर परिसरातील भूमिगत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली अजुनी चालतोची वाट... १५६