पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खान, सुशीला मडिमन, रंगनाथ कुलकर्णी वगैरेंनी उत्तम भाषणे केली. त्यावेळी पॅरोलवर सुटून आलेले अमर शेखही परिषदेला हजर होते. त्यांची क्रांतिगीते म्हणजे अशा कार्यक्रमांची जानच असायची. अधिवेशनात संमत झालेले सर्वच ठराव रावसाहेबांच्या हस्ताक्षरातले होते. अधिवेशन स्थळाच्या जवळच एक रेसिडेन्शिअल हायस्कूल होते व तिथल्या एका खोलीत मुक्काम ठोकूनच रावसाहेब गुप्तपणे अधिवेशनाचे सूत्रसंचालन करत होते. अर्थात ही गोष्ट बहुतेकांना नंतरच समजली. अधूनमधून रावसाहेब आईवडलांना भेटायला म्हणून पाडळीलाही जात. भूमिगत असल्यामुळे प्रत्यक्ष प्रवास असा रात्रीचाच करावा लागे. असेच एकदा रात्री ते सावरगावहून पाडळीला चालले होते. एकाएकी आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी व्हावी असाच अगदी अक्राळविक्राळ पाऊस कोसळत होता. खिंडीतली ही पाऊलवाट खाली घळईतूनच जाणारी, खोलगट भागातली अशी होती. पावसाचे सगळे पाणी त्याच वाटेने वाहत होते; त्यातून चालणे खूप अवघड होते. सगळी वाट दगडगोट्यांनी भरलेली. दगडांवरून पाय सारखे घसरत होते, चांगलेच सोलवटून निघाले होते. ढगांच्या गडगडाटामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे सगळेच वातावरण खूप भयाण वाटत होते. तशात भर म्हणजे दोन्ही बाजूंच्या डोंगरउतारांवरून छोटेमोठे दगड घरंगळत खाली येत होते; त्यातला एखादा जरी अंगावर आदळला तरी जबर जखमी व्हायची शक्यता होती. कसाबसा जीव मुठीत धरून, विजांच्या प्रकाशात वाट हुडकत रावसाहेबांनी ती खिंड ओलांडली. आता शेताडातून जाणारा सपाटीचा रस्ता होता. तो सगळाच चिखलाने भरलेला. कुठल्याही क्षणी विंचू - साप चावायची भीती. दोन तास वादळाशी झुंजत ते आपल्या घराच्या ओसरीवर जाऊन पोचले तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले मिट्ट काळोखात गाव झोपले होते. लांबून कुठून तरी कुत्र्याचे भुंकणे तेवढे कानावर येत होते. दादांनी दरवाजा उघडला. ओलेचिंब झालेले, अंगावरून कपड्यांवरून पाणी निथळणारे रावसाहेब घरात शिरले. तेवढ्यात बाईही उठून बाहेर आल्या. कंदिलाच्या उजेडात लेकाकडे बघताबघता दादांना एकदम गहिवरून आले. "भाऊ, काय हे तुमचे हाल ? एवढ्या वादळात अंधारातून खिंडीतून कसे काय आलात ?” काळजीने आणि दुःखावेगाने त्यांना पुढे बोलवेना. पण रावसाहेबांच्या डोक्यात क्रांतीचेच वारे भरले होते. आईवडलांची प्रेमाने विचारपूस करण्याऐवजी ते उलटे आईवडलांनाच फैलावर घेऊ लागले. "अंमळनेरचे श्रीपत पाटील गोळीबारात ठार झाले. आणखीही काही जण गेले. बरेच जण लाल ताऱ्याची साथ... १५५