पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणा बाबांचे कीर्तन आहे. लगेच त्यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ते रात्री कीर्तनाला गेले. पेट्रोमॅक्स दिव्याच्या उजेडात कीर्तन सुरू झाले. गर्दी बरीच होती. मध्ये एकदा आरामासाठी बाबांनी काही मिनिटांसाठी कीर्तन थांबवले. ती संधी साधून रावसाहेब घाईघाईने स्टेजवर गेले व आपल्या खड्या आवाजात त्यांनी स्वतःच बोलायला सुरुवात केली. सगळे श्रोते आणि कीर्तनकार अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले; पण कोणी त्यांना अडवले मात्र नाही. आपली नेहमीची कम्युनिस्ट मते मांडत त्यांनी अर्धा तास जोरदार भाषण केले आणि पटकन स्टेजवरून ते खाली उतरले व काळोखात मिसळत नाहीसेही झाले. त्या पारंपरिक, धार्मिक श्रोत्यांच्या दृष्टीने रावसाहेबांचे विचार अगदी धक्कादायकच होते. एवढे सगळे झाल्यावर त्यांना आता सुगावमध्ये एक दिवसही जास्त थांबणे अशक्य होते कारण पोलिसांपर्यंत ही बातमी लगेच पोचणारच होती. हक्काचा आसरा सोडून रावसाहेबांना आपली भटकंती पुढे चालू ठेवावी लागली. अशा छुप्या-छुप्या घेतलेल्या रात्रीच्या अनियोजित सभा हे आता त्यांचे मुख्य पक्षकार्य राहिले होते. भाऊसाहेब थोरात यांच्या जोर्वे येथील वस्तीवर त्यांचा खूपदा मुक्काम असे. स्वत: भाऊसाहेब, धर्मा, आठरे पाटील वगैरे अनेक भूमिगत कम्युनिस्ट इथे लपून राहत. त्या दृष्टीने ही वस्ती खूप सोयीची होती. ही वस्ती भाऊसाहेबांच्या मोठ्या शेतातच होती. शेत प्रवरा नदीला लागूनच होते. येथे झाडेझुडपे, गवत यांची एक थडी तयार झाली होती. चारी बाजूंनी मोठ्या झुडपांची गर्द जाळी तयार झाली होती. जाळी खूप मोठी व डेरेदार होती. चारी बाजूंनी फांद्यांचा अडसर होता. खोडाभोवतीच्या मोकळ्या गोलाकार जागेत आरामशीर बसायची, लोळायची, झोपायचीही सोय होती. भाऊसाहेबांच्या घरून भाकऱ्यांचा पुरवठा होई. प्यायला, हातपाय धुवायला प्रवरेचे पाणी हाताशी होतेच. पोलीस जेव्हा वस्तीवर सासा येत तेव्हा ते या परिसरातही अवतीभवती फिरायचे; पण जाळीच्या दाट पडद्यामुळे त्यांना आतले काही दिसत नसे. याउलट आतल्या तरुणांना मात्र फांद्यांच्या फटींतून बाहेरचे पोलीस दिसत असत ! अशा वेळी त्यांना हसू आवरत नसे; पण आवाज बाहेर फुटणार नाही याची खबरदारी घ्यावी लागे ! भूमिगत असतानाचा एक मोठा उपक्रम म्हणजे १९४८ साली अहमदनगरला भरलेले ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे अधिवेशन. रावसाहेब उघडपणे त्याला हजर राहू शकले नाहीत तरी त्यामागची एक मोठी प्रेरणा त्यांचीच होती. शिंदे बोर्डिंगचे सर्व विद्यार्थी अधिवेशनासाठी संगमनेरहून अहमदनगरला सायकलने गेले होते. ए. बी. वर्धन (पक्षाचे आताचे सरचिटणीस), सतपाल डांग, वदूद अजुनी चालतोची वाट... १५४