पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेबांमध्ये कुठून आला याचेही एक उत्तर या लहानपणीच अंगी बाणलेल्या वैचारिक परिपक्वतेत आहे. या प्रौढत्वामुळेच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रावसाहेब शिंदे बोर्डिंग सुरू करू शकले आणि तिथल्या समवयस्क मुलांचे पालकत्वहीं स्वीकारू शकले. त्यांचे बोर्डिंगमधलेच एक मित्र, अकोले येथील डॉ. बी. जी. बंगाळ यांनी रावसाहेबांविषयी लिहिताना त्यांच्या 'वयाशी विसंगत अशा पांडित्यपूर्ण अस्खलित वक्तृत्वाचा' आवर्जून उल्लेख केला होता. १९४८च्या प्रारंभीच कलकत्ता येथे कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. अधिवेशनात जास्तीत जास्त जहाल मतांचे प्रतिनिधी कसे हजर राहतील याची पूर्वतयारी खूप पूर्वीपासून सुरू होती. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात त्यावेळी जोरदार सत्तासंघर्ष सुरू होता. बी. टी. रणदिवे व नंबुद्रीपाद यांच्यासारख्या जहाल नेत्यांच्या हाती सगळी सूत्रे एकवटत होती आणि एस. ए. डांगे व एस. सी. जोशी यांच्यासारखे मवाळ नेते पक्षात निष्प्रभ ठरत होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून हा सत्तासंघर्ष लपवून ठेवला गेला होता. पार्टीच्या कलकत्ता अधिवेशनात ही प्रक्रिया पूर्णत्वाला गेली. 'भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नाहीच, हे सरकार ब्रिटिशांचे हस्तक आहे, कोणत्याही परिस्थितीत ते उलथवून टाकले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सशस्त्र क्रांतीचाच मार्ग स्वीकारावा लागेल' असा अतिशय जहाल ठराव त्या अधिवेशनात संमत झाला. एवढे सगळे झाल्यानंतर सरकार स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. कम्युनिस्ट पक्षावर रातोरात बंदी घातली गेली. अधिवेशनाला गेलेले प्रतिनिधी आपापल्या राज्यात परतण्यापूर्वीच अटकसत्र सुरू झाले. अर्थात कम्युनिस्टांची त्यासाठी मानसिक तयारी झालेलीच होती. या धरपकडीचा एक भाग म्हणूनच रावसाहेबांविरुद्ध पोलिसांचे पकड वॉरंट निघाले व त्यामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले. हा भाग मागील प्रकरणात आलाच आहे. भूमिगत झाल्यावरही त्यांचे पक्षकार्य चालूच राहिले. पण हे काम आता पोलिसांची नजर चुकवून करायचे होते. त्यासाठी सर्वप्रथम रावसाहेबांनी आपला वेष बदलला. खाली धोतर, वर सदरा, सदयावर कोट आणि डोक्याला फेटा असा वेष धारण केला. शिंदे बोर्डिंगमधून बाहेर पडल्यावर पहिल्याच दिवशी ते संगमनेरपासून बारा मैलांवर असलेल्या सुगाव या गावी गेले. त्यांची बहीण चहाबाई व मेव्हणे लक्ष्मणराव वाकचौरे तिथे राहत. मेहणे तलाठ्याची नोकरी करत व त्यांचे घर मोठे होते. तिथे बरेच दिवस लपून राहणे शक्य होते. पण चळवळीचा किडा रावसाहेबांना एकाच जागी फार काळ बसू देणे शक्य नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्यांना समजले की गावात प्रवरा नदीच्या काठावर रात्री लाल ताऱ्याची साथ... १५३