पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठेवा वाटतो. मला त्यापासून प्रेरणाही मिळते. त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही ही फार मोठी चूक झाली असं वाटतं आणि त्याचा मनाला खेद होतो. पुढे अंत्यविधीच्या वेळी त्यांचं अखेरचं दर्शन मी डबडबलेल्या डोळ्यांनी घेतलं. " पटवर्धनबंधूंचा महात्माजींच्या साधनशुचितेवर अढळ असा विश्वास होता व म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणातली घसरण आणि तत्त्वच्युती त्यांना पाहवली नाही; दोघांनीही उतारवयात पूर्ण राजकारणसंन्यासच घेतला. एकूणच हा सगळा प्रसंग आपल्याला बरेच काही सांगणारा आहे. अहमदनगरसारख्या दुष्काळी, मागासलेल्या, ज्या जिल्ह्यात फक्त एकच कॉलेज होते अशा जिल्ह्यात, आणि तेही टीव्हीसारखी संपर्कमाध्यमे अस्तित्वातही नव्हती अशा काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावरती कम्युनिस्टांच्या जाहीर सभा होत होत्या. आपल्या विचारसरणीला असलेले हे जागतिक कोंदण, हा जबरदस्त जागतिक आवाका हे त्या काळी युवकांना आणि बुद्धिजीवींना कम्युनिझमविषयी आकर्षण वाटायचे एक मोठे कारण होते; अन्य राजकीय पक्ष तेव्हा बव्हंशी स्थानिक प्रश्नांमध्येच गुरफटलेले होते. दुसरे म्हणजे आपल्या भोवतीच्या गरिबी, उपासमार, बेकारी, निरक्षरता, विषमता यांसारख्या समस्या जगातल्या सर्वच देशांत समान आहेत आणि त्यांवरचे श्रमिकांची सत्ता आणि त्यासाठीचे भांडवलशाहीविरुद्धचे वर्गयुद्ध हे अंतिम उत्तरही तितकेच सर्वव्यापी आहे असे एक सकृतदर्शनीतरी शास्त्रशुद्ध व मूलग्राही वाटणारे तत्त्वज्ञान कम्युनिस्ट मांडत होते. 'हेच अंतिम आणि एकमेव उत्तर आहे; बाकी सगळे बाळबोध आणि अशास्त्रीय, रिअॅक्शनरी आणि बूर्वा आहे' असे ठामपणे सांगणाऱ्या या तत्त्वज्ञानाची नशा तरुणांना कशी चढत होती, त्यातून एक अभिनिवेश कसा निर्माण होत होता आणि त्यातून एका राष्ट्रीय नेत्यालाही चार शब्द सुनावण्याचा आक्रमक उत्साह एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्येही कसा निर्माण होत होता हेही हा प्रसंग दाखवितो. पटवर्धनांनी रावसाहेबांचा उल्लेख 'पिट्टू' म्हणून करणे यामागे कदाचित त्यांचा बुटका देह वा लहान चण हे एक कारण असू शकेल, पण त्यांच्या हुशारीकडेही ते कौतुकाने निर्देश करते. शिवाय ते रावसाहेबांच्या आणखी एका वैशिष्ट्यावर प्रकार टाकणारे आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे रावसाहेबांचे वयाच्या मानाने वैचारिकदृष्ट्या अधिक प्रौढ असणे. इतक्या लहान वयातच, नाशिकला शाळेत शिकत असतानाच, त्यांनी बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय भाग कसा घेतला होता याचेही हे उत्तर आहे. नाशिकला ज्यांच्याकडे ते राहत होते त्या किसनमामांनी दारू आणण्यासाठी दिलेले पैसे त्यांच्याच अंगावर परत भिरकावण्याचा बाणेदारपणा अजुनी चालतोची वाट... १५२