पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जात आहोत हे मात्र त्यांनी रावसाहेबांना सांगितले नाही. पटवर्धन वाड्यासमोर ते पोहोचले तेव्हाच गोसावींनी खुलासा केला. "अरे, काल गांधी मैदानात तुझं भाषण सुरू होतं, त्यावेळी रावसाहेब त्या बाजूने फिरत चालले होते. तुझं भाषण कानावर आल्यावर ते थबकले. इतकंच नाही तर तुझं संपूर्ण भाषण त्यांनी उभं राहून ऐकलं. तिथेच त्यांची व माझी गाठ पडली. तेव्हा ते मला म्हणाले, 'हा कोण पिट्टू तुम्ही धरून आणला रे? किती उत्कृष्ट भाषण करतोय! त्याच्या भाषणामुळे मी खिळून उभा राहिलो. उद्या त्याला माझ्याकडे घेऊन ये.' ते असं म्हणाले म्हणून मी तुला आत्ता इथे घेऊन आलो आहे." जिना चढून दोघे वर गेले. आपल्या प्रशस्त दिवाणखान्यात पटवर्धन बसले होते. पटवर्धन अतिशय देखणे, राजबिंडे होते. प्रसन्न मुद्रेने त्यांनी दोघांचे स्वागत केले. आधी त्यांनी रावसाहेबांची व्यक्तिगत माहिती विचारली; मग त्यांच्या भाषणाचे आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे कौतुक केले. " हे सगळं खूप चांगलंच आहे, पण सध्या तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, शिक्षण पूर्ण कर आणि मग राजकारणात पड, ' असा अतिशय आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला. रावसाहेब पटवर्धन त्यावेळी अखिल भारतीय पातळीवर मान्यता पावलेले काँग्रेसचे मोठे नेते होते. खुद्द पंडित नेहरूंशी त्यांचे चांगले संबंध होते. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन ही जोडगोळी म्हणजे केवळ नगरचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण होते. नगरमध्ये आलेला कुठलाही बडा नेता त्यांच्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक पटवर्धन वाड्यावर हजेरी लावल्याशिवाय राहत नसे. आपल्या ओजस्वी वक्तृत्वासाठीही ते खूप प्रसिद्ध होते. इतक्या मोठ्या नेत्याला आणि नामांकित वक्त्याला आपले भाषण इतके आवडावे, त्याची त्याने इतकी स्तुती करावी, व्यक्तिशः आपल्याविषयी इतकी आस्था दाखवावी ही कोणाही तरुण विद्यार्थ्याने अगदी हुरळून जावे अशीच बाब होती. पण त्या दिवशी जरासुद्धा नम्रता न दाखवता रावसाहेब आपलीच मते फाडफाड मांडत राहिले; काँग्रेस पक्षाचे धोरण किती चुकीचे आहे हेच तावातावाने सांगत राहिले. यामागे पटवर्धनांचा उपमर्द करण्याचा हेतू नव्हता पण त्यांचे एकूण सगळे बोलणे हे खूपसे उथळ, आततायी आणि औचित्यभंग करणारे होते. अर्थात त्यांचे बोलणे पटवर्धनांनी मनाला लावून घेतले नाही; हलकेच हसत आणि पाठीवर प्रेमाने आणि कौतुकाने थाप मारत त्यांनी रावसाहेबांना निरोप दिला आणि जाता- जाता 'मोठा हो, बाळ' म्हणून आशीर्वादही दिला. रावसाहेब म्हणतात, " त्यांचा तो आशीर्वाद मला माझ्या जीवनातला मूल्यवान लाल ताऱ्याची साथ... १५१