पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करू लागले. अहमदनगरमध्ये अधूनमधून कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या विषयांवर जाहीर सभा होत व अशा सभांमधून रावसाहेबही भाषण करत असत. नगरच्या गांधी मैदानात एकदा अशीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल सभा होती. कम्युनिस्टांचा लढा हा जागतिक पातळीवरचा लढा होता; त्यांची वैचारिक झेप ही फक्त स्थानिक प्रश्नांपुरती किंवा फक्त भारतापुरती नव्हती; या चळवळीला पुरेपूर आंतरराष्ट्रीय भान होते. रशियामधील महायुद्धानंतरच्या घडामोडी, पूर्व युरोपात स्थापन झालेल्या कम्युनिस्ट राजवटी, चीनमधला माओचा उदय, अमेरिकेचे साम्राज्यवादी धोरण असले विषय कम्युनिस्ट नेहमीच हाताळत. त्यावेळी व्हिएटनाममध्ये युद्धाचा भडका उडाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या वाटाघाटींचा भाग म्हणून फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या इंडोचायनाचे व्हिएटनाम, कांबोडिया आणि लाओस अशा तीन देशांमध्ये विभाजन झाले होते. व्हिएटनाम हा त्यांतला सर्वात मोठा हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली तिथे प्रबळ अशी सशस्त्र लाल सेना उभी राहिली होती. व्हिएतनाम हा स्वतंत्र देश असल्याचे त्यांनी डिसेंबर १९४६ मध्ये घोषित केले होते व हनोई येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कम्युनिस्ट सरकारही स्थापन केले होते. फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका यांचा हो चि मिन्ह राजवटीला अर्थातच विरोध होता व हनोईमधील कम्युनिस्ट राजवट चिरडून टाकण्यासाठी त्यांनी युद्ध सुरू केले होते. त्यातून हनोई ही राजधानी असलेले कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनाम व सायगाव ही राजधानी असलेले अमेरिकाधार्जिणे दक्षिण व्हिएतनाम असे विभाजन झाले होते. असाच काहीसा प्रकार जिथे डचांची सत्ता होती त्या इंडोनेशियामध्येही घडला होता; तिथेही जोरदार सशस्त्र सत्तासंघर्ष सुरू होता. दानावरच्या त्या सभेचा विषय 'अमेरिकन साम्राज्यवाद' हाच होता. रावसाहेबांनी तब्बल तासभर त्या सभेत खूप त्वेषाने भाषण केले. नेहरू सरकारची याबाबतची भूमिका अगदी बोटचेपी आहे आणि हे सरकार साम्राज्यवाद्यांपुढे नेहमीच लोटांगण घालते अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. रावसाहेब तसे या विषयावर नेहमीच बोलत पण या भाषणाचा विशेष उल्लेख करायचे एक कारण आहे. दुसऱ्या दिवशी बाबा गोसावी यांनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतले. गोसावी नगरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये एक शिक्षक होते व स्वतः कम्युनिस्ट असले तरी त्यांचे आचारविचार खूप समतोल आणि सौजन्यपूर्ण होते व त्यामुळे नगरमधल्या सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी त्यांची मैत्री होती. रावसाहेबांना घेऊन ते रावसाहेब पटवर्धन यांच्या घरी गेले, पण आपण तिकडे का अजुनी चालतोची वाट... १५०