पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नव्या कॉम्रेडचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले; त्यांच्या राहण्याखाण्याची नीट व्यवस्था केली. गप्पांच्या ओघात रावसाहेबांना हेही कळले, की तिथले कॉ. राजेश्वरराव आणि कॉ. सुंदरय्या यांसारखे अनेक कम्युनिस्ट पुढारी हे खूप सधन अशा जमीनदार घराण्यांमधले होते व त्यांच्या त्यागामुळे पक्षासाठी अशा प्रशस्त जागा उपलब्ध झाल्या होत्या. बेझवाड्यातील स्थानिक कार्यकर्त्यांसमोर रावसाहेबांचे भाषणही आयोजित केले गेले. महाराष्ट्रातल्या पक्षकार्याविषयी ते बोलले. बेझवाड्यानंतर रावसाहेबांना गुंटूर येथे पाठवण्यात आले. गुंटूर हेही कम्युनिस्ट चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. तेथेही कार्यकर्त्यांसमोर त्यांचे भाषण आयोजित केले गेले. गुंटूरमध्ये दोन - तीन दिवस काढल्यानंतर तेलंगणातून तेथील कार्यकर्त्यांचा असा निरोप आला, की "सध्या स्थानिक परिस्थिती खूप चिघळलेली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव रावसाहेब शिंदे यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना इकडे पाठवू नये." त्यामुळे मग रावसाहेब अहमदनगरला परतले. पण व्यक्तिशः ही आंध्रभेट फलदायीच ठरली. एकतर महाराष्ट्राबाहेर जायचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग. त्याकाळी आजच्यासारखा प्रवास सुलभ नव्हता. त्यातही पुन्हा चळवळीच्या कामासाठी असे लांबवर जाणे याचे अप्रूप अधिकच होते. बेझवाडा व गुंटूर या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातील एक युवानेता या भूमिकेतून त्यांनी भाषणे केली. परप्रांतात आपली 'महाराष्ट्रातील नेता' म्हणून ओळख होणे हे व्यक्तिशः सुखद होतेच पण शिवाय पक्षाप्रतीच्या वैयक्तिक जबाबदारीची जाणीव वाढवणारे होते; पक्षनिष्ठेचे वर्तुळ विस्तारणारे होते. बेझवाडा व गुंटूर या दोन्ही ठिकाणी रावसाहेबांना प्रथमच सायकलरिक्षा पाहायला मिळाल्या व त्यांत बसावेही लागले. हा प्रकार महाराष्ट्रात नव्हता. आपण आरामात मागे बसायचे आणि त्या वायने रणरणत्या उन्हातान्हात ती रिक्षा चालवायची हा प्रकार त्यांना खूप क्लेशदायक वाटला. हे रिक्षावाले बहुधा उघड्या अंगानेच रिक्षा चालवायचे. त्यांचे घामाने निथळणारे कृश शरीर आणि वर आलेल्या बरगड्या नजरेत खुपायच्या. देशातील आत्यंतिक दारिद्र्य आणि विषमता यांची जाणीव करून देणारा आणि त्याविरुद्ध संवेदनशील मनात चीड़ उत्पन्न करणारा असाच तो अनुभव होता. त्याचवेळी या रिक्षावाल्यांची एक युनियन काही कम्युनिस्ट मंडळी उभारत आहेत व त्यामुळे या रिक्षावाल्यांची परिस्थिती लौकरच सुधारेल असेही त्यांना सांगण्यात आले. समाजातल्या अगदी वंचित अशा घटकांसाठी आपला पक्ष काम करत आहे ही जाणीवही पक्षनिष्ठा अधिक बळकट करणारी होती. आंध्रातून परतल्यावर रावसाहेब पक्षाचे काम अधिकच जोमाने लाल ताऱ्याची साथ... १४९