पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होता. कम्युनिस्टांनी तेलंगणात जणू प्रतिसरकार स्थापन केल्यासारखीच परिस्थिती होती. वातावरण खूप स्फोटक होते. फेडरेशनचा प्रतिनिधी म्हणून रावसाहेबांनी तिथे जावे, एकूण परिस्थितीची पाहणी करावी, लोकआंदोलनाचा आढावा घ्यावा, त्या सगळ्याची माहिती संकलित करावी आणि महाराष्ट्रातील जनतेपर्यंत व विशेषत: विद्यार्थ्यांपर्यंत तो 'आँखो देखा हाल' पोचवावा अशी वदूद खानांची इच्छा होती. त्यातून येथील युवकांनाही तशाच प्रकारे उठाव करायची प्रेरणा मिळणार होती. तेलंगणामधील तत्कालीन उठाव हा कम्युनिस्टांच्या दृष्टीने भारतासाठी एक आदर्श होता, एक रोल मॉडेल होते आणि म्हणूनच त्याची माहिती देशभर पोचणे आवश्यक होते. हे काम रावसाहेबांसारख्या चळवळीत नव्याने दाखल झालेल्या धडाडीच्या तरुणावर सोपवणे हाही कम्युनिस्ट कार्यपद्धतीचाच एक भाग होता. त्यातून रावसाहेबांना प्रत्यक्ष आंदोलनाचा अधिक अनुभव मिळणार होता, आपले आंदोलन म्हणजे कुठल्यातरी बारीकसारीक स्थानिक प्रश्नावरून छेडलेले छोटेमोठे आंदोलन नसून संपूर्ण देशात, किंबहुना संपूर्ण जगात, क्रांती घडवून आणणाऱ्या एका विशाल व्यूहरचनेचा हे एक भाग आहे याची जाणीव रावसाहेबांना होणार होती. त्यातून त्यांची पक्षावरची निष्ठा अधिक दृढ होणार होती; प्रत्यक्ष आंदोलनातल्या सहभागातून एक उत्तम कम्युनिस्ट कार्यकर्ता घडवायचा तो प्रयत्न होता. रावसाहेबांना त्यावेळी याची बहुधा कल्पनाही नसावी, पण त्यांना तेलंगणात पाठवायचा निर्णय हा एकट्या वदूद खानांचा नक्कीच नव्हता. पक्षाच्या राज्यपातळीवरील नेतृत्वात याची चर्चा नक्कीच झाली असणार; कारण पक्षाच्या लहानात लहान कार्यकर्त्यापासून अगदी नॅशनल पॉलिट ब्युरोपर्यंत प्रत्येक पातळीवर घट्ट व मध्यवर्ती अशी पकड असणारी यंत्रणा कम्युनिस्ट पक्षात होती. व्यक्तिगत पातळीवरील वैचारिक निष्ठेप्रमाणेच सुनियंत्रित पक्षसंघटना हेही पक्षाचे एक मोठे सामर्थ्य होते. हैद्राबादला जाण्यासाठी रावसाहेबांनी मुंबईहून ट्रेन पकडली. त्यांना निरोप द्यायला वदूद खान व सुशीला मडिमन हे दोघेही बोरीबंदर स्टेशनवर आले होते. आगाऊ तिकिटांची व्यवस्थाही त्यांनीच करून ठेवली होती. कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत पातळीवर एकमेकांची अशी काळजी घेणे हादेखील कम्युनिस्ट पक्षउभारणीतला एक महत्त्वाचा भाग होता. रावसाहेबांचा पहिला मुक्काम बेझवाडा (विजयवाडाचे प्राचीन नाव) येथे होता. तिथे पक्षाचे प्रशस्त ऑफिस, राहण्यासाठी खोल्या, प्रचारसाहित्यासाठी सुसज्ज छापखाना असा सगळा पसारा होता. तो सगळा व्याप बघून ते आश्चर्यचकित झाले. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अहमदनगरच्या या अजुनी चालतोची वाट... १४८