पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोळ्या लागल्या. आता मात्र सगळीकडे एकच पांगापांग सुरू झाली. जीव मुठीत धरून विद्यार्थी उलटसुलट दिशेने पळू लागले. स्वत:चा जीव वाचवण्याबरोबरच सोबतच्या शंभर विद्यार्थ्यांची रावसाहेबांना प्रचंड काळजी लागून राहिली होती. चेंगराचेंगरी सुरू झाल्यावर प्रत्येक जण मिळेल त्या दिशेने मैदानाबाहेर पळाला आणि कोण कुठल्या दिशेने पळाला याचा कुणालाच काही अंदाज नव्हता. मुंबईसारख्या परक्या महानगरात आणि खिशात एक दमडासुद्धा नसताना या ग्रामीण विद्यार्थ्यांचे कसे होणार याचा घोर रावसाहेबांच्या जिवाला होता. संध्याकाळी खालसा कॉलेजात मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर आपले सगळे साथीदार सुरक्षित असल्याचे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. आपल्याला खालसा कॉलेजात पोचायचे आहे एवढे सगळ्या विद्यार्थ्यांना ठाऊक होते आणि आपापल्या परीने रस्ता शोधत सगळे एकदाचे तिथे पोचले. लाठ्यांचा मार अनेकांना पडला होता पण सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा सगळा अनुभव अगदी रोमांचकारी असा होता. दुस-या दिवशी अहमदनगरला पोचेस्तोवर त्यांची आपापसांत तीच चर्चा सुरू होती. फेडरेशनची ती परिषद देशभर खूप गाजली. इथला लाठीमार, अश्रुधूर आणि गोळीबार यांची हकीकत वर्तमानपत्रांमुळे सगळीकडे पसरली. एकूण सहाशेच्यावर विद्यार्थी जखमी झाले होते. सगळीकडे सरकारच्या निषेधाचे सूर उमटू लागले. अशा एखाद्या महत्त्वाच्या घटनेत आपण स्वतः सहभागी होतो, प्रत्यक्ष गोळीबार होताना आपण बघितला, त्यातून सहीसलामत सुटलो, ह्या सगळ्याची जाणीव एका अर्थाने त्या विद्यार्थ्यांना सुखावणारी होती व त्याचवेळी त्यांचे आत्मबळ आणि चळवळीपोटीची निष्ठा वाढवणारी होती. संकटात तावून सुलाखून तयार झालेले असे आता ते क्रांतिकारक होते. स्टुडंट्स फेडरेशनच्या मुंबई परिषदेत रावसाहेबांचा वदूद खान व सुशीला मडिमन या तरुण व प्रखर ध्येयवादी अशा कम्युनिस्ट युवानेत्यांबरोबर परिचय झाला. परिषदेच्या आयोजनात त्या दोघांचा सिंहाचा वाटा होता व शंभर ग्रामीण विद्यार्थ्यांना घेऊन परिषदेला आलेल्या रावसाहेबांचे त्यांना खूप कौतुक वाटले होते. व्यासपीठावरूनही त्यांनी रावसाहेबांच्या योजकतेचे आणि धडाडीचे कौतुक केले होते. कामाची आणखी वरची पायरी म्हणून त्यांनी रावसाहेबांना तेलंगणात पाठवायचे ठरवले. तिथले जमीनदार व निजामाचे सशस्त्र रझाकार हे गोरगरीब जनतेवर खूप अत्याचार करत. त्यांच्याविरुद्ध कम्युनिस्टांनी सशस्त्र लढा उभारला होता. लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पक्षाचा जोर वाढत लाल ताऱ्याची साथ... १४७