पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परळला कामगार मैदानावर भरणार होती. पटापट प्रातर्विधी उरकून सगळे विद्यार्थी पुन्हा तयार झाले आणि त्यांची मिरवणूक दोन मैलांवर असलेल्या कामगार मैदानाकडे चालू लागली. ग्रामीण भागातून आलेले हे विद्यार्थी प्रतिनिधी सगळ्याच परिषदेचा कौतुकाचा विषय बनले. परिषद दोन दिवसांची होती. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता परिषदेचे खुले अधिवेशन होते. फी वाढीला विरोध हा महत्त्वाचा मुद्दा होताच पण त्यानिमित्ताने एकूणच नव्या सरकारवर सगळे आगपाखड करत होते. कम्युनिस्ट पक्षाचे धोरण स्वतंत्र भारताच्या सरकारला कडाडून विरोध करणारेच होते व त्याला धरूनच सगळी भाषणे होत होती. एकूण वातावरण खूप तापले होते. तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. सरकारने अकस्मात परिषदेवर बंदी आणली व बंदी - हुकूम घेऊन पोलीस अधिकारी व्यासपीठावर आले. परिषद ताबडतोब बंद करायचा आदेश त्यांनी आयोजकांना दिला. आयोजकांना अर्थातच तो मान्य नव्हता. या सगळ्या नाट्यपूर्ण प्रकाराकडे हजारो श्रोते स्तंभित होऊन बघत होते; नेमके काय चालले आहे कोणालाच उलगडत नव्हते. व्यासपीठावर पुढाऱ्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची बाचाबाची सुरू असतानाच पोलिसांच्या अनेक गाड्या मैदानालगत आल्या. आधीच बराच फौजफाटा तेथे तैनात केलेला होताच. आदेशानुसार धडाधड पोलीस खाली उतरले आणि त्यांनी मैदानाला वेढा घातला. इकडे व्यासपीठावरून "सगळ्यांनी ताबडतोब मैदान सोडून जावे" असा आदेश पोलीस अधिकारी देत होते आणि त्याचवेळी "कुठल्याही परिस्थितीत परिषद चालूच राहील" असे कम्युनिस्ट नेते माइकवरून सांगत होते. तेवढ्यात पोलिसांनी लोकांना मैदानाबाहेर हाकलण्यास सुरुवात केली. पण जमाव हटेना. ते पाहून पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तरीही लोक हलले नाहीत. उलट बरेच जण पोलिसांच्या लाठ्या धरून त्या त्यांच्या हातून हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू लागले. मैदानाला एखाद्या युद्धभूमीचेच स्वरूप प्राप्त झाले. लोक हटेनात तशी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडायला सुरुवात केली. धूर नाका- तोंडात आणि डोळ्यांत जाऊ लागला. डोळ्यांची आग होऊ लागली आणि नीट दिसेनासेही झाले. धूर शरीरात गेल्यामुळे जीव गुदमरू लागला. वरून पोलिसांच्या लाठ्या बरसतच होत्या. बहुसंख्य प्रतिनिधी सळसळत्या रक्ताचे तरुण विद्यार्थी होते; माघार घ्यायची त्यांची तयारी नव्हती. मोठ्या जिद्दीने ते तग धरून मैदानातच राहिले. एवढा कडवा प्रतिकार बहुधा पोलिसांनाही अपेक्षित नव्हता. जमाव पांगवण्यासाठी शेवटी गोळीबार सुरू झाला. सुरुवात अर्थातच हवेत गोळ्या झाडण्यापासून झाली; पण चार-पाच मिनिटांनी काही विद्यार्थ्यांना ही अजुनी चालतोची वाट... १४६