पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशीच ठरली. परिषदेच्या पूर्वतयारीसाठी रावसाहेबांनी जिल्हाभर दौरा केला. शंभरच्यावर विद्यार्थी प्रतिनिधी घेऊन रावसाहेब मुंबईला गेले. हे विद्यार्थी बव्हंशी हायस्कूलमधलेच होते, कारण त्या वेळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अहमदनगर कॉलेज हे एकमेव कॉलेज होते. नाशिकजवळच्या घोटी या रेल्वेस्थानकावर सगळे जण मुंबईला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये चढले. सगळेच विनातिकीट; कारण तिकीट काढायला पैसे कोणाकडेच नव्हते. मुंबईला सगळे प्लॅटफॉर्मवर उतरले. गर्दीमुळे बरेच विद्यार्थी सहजगत्या स्टेशनबाहेर जाऊ शकले पण काही जणांना मात्र स्टेशनच्या दारातच तिकीट चेकरने अडवले. आता मोठी पंचाईत आली. "दंड भरल्याशिवाय मी सोडणार नाही, उद्या मॅजिस्ट्रेटपुढे उभं करतो, " अशी त्याने धमकी दिली. कायदेशीरदृष्ट्या त्याचे म्हणणे बरोबर होते. स्टेशनबाहेर पडलेली मुलेही दारातच खोळंबून राहिली, कारण मुंबईला पोचल्यावर पुढे कुठे आणि कसे जायचे हे त्यांना कोणालाच ठाऊक नव्हते. ती माहिती एकट्या रावसाहेबांनाच होती आणि ते तर प्लॅटफॉर्मवरच अडकले होते. शेवटी प्रसंगावधान राखून रावसाहेबांनी टीसीला सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली. ही मुले तशी गरीब आणि प्रामाणिक दिसताहेत, केवळ परिषदेसाठी म्हणून मुंबईला आली आहेत हे टीसीला पटले. त्यालाही त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली आणि शेवटी त्याने सर्वांना बाहेर सोडले. माटुंग्याला खालसा कॉलेज नावाचे एक कॉलेज आहे आणि तिथे आपली सगळ्यांची राहायची सोय केली आहे एवढे रावसाहेबांना ठाऊक होते पण त्यापलीकडे त्यांना काहीच माहिती नव्हती. मुंबईला ते प्रथमच येत होते; बरोबरच्या इतर कुठल्या विद्यार्थ्यालाही मुंबईची काहीच माहिती नव्हती. स्वत: इतरांना विचारत विचारत रस्ता शोधत रावसाहेब बरोबरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू पुढे रावसाहेब आणि मागे ती शंभर मुले. हळूहळू रांग पुढे सरकू लागली. सगळ्यांच्या हातात एकेक वळकटी होती. अंगात साधा सदरा, अर्धी चड्डी व डोक्यावर टोपी असा सगळ्यांचा पोशाख. मुंबईबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल होते. मोठाले रस्ते, दुतर्फा असलेल्या इमारती, रस्त्यांवरून जाणाऱ्या ट्रॅम्स, बसेस, ट्रक्स व मोटारी हे सगळेच मुंबईचे पहिले दर्शन डोळ्यांत साठवत विद्यार्थी चालले होते. ट्रॅम्सतर ते आयुष्यात प्रथमच बघत होते. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीनेही खेड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांची ही रांग तेवढ्याच कुतूहलाचा विषय होती. खालसा कॉलेजात पोचल्यावर स्थानिक आयोजकांची भेट झाली. खालसा कॉलेजातल्याच दोन हॉल्समध्ये या सगळ्यांची राहायची सोय होती. प्रत्यक्ष परिषद लाल ताऱ्याची साथ... १४५