पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आम्हा अजब शत्रुनं गाठलं, मागं लागलंया डाळीचं पिठलं, मागं लागलंया डाळीचं पिठलं!' त्यांच्यासोबतची कलापथकातली इतर मंडळीही लगोलग उभी राहिली, कोणीतरी डफावर थाप दिली आणि सगळे जण त्या ठेक्यावर नाचू लागले. बोर्डिंगमधली मुलेही मग उभी राहिली • क्षणभर काहीशा आश्चर्याने आणि सगळी गंमत लक्षात आल्यावर मग हसतहसत सगळेच एकदम नाचायला लागले, हास्यकल्लोळात बुडून गेले. खेडोपाडी जेव्हा जेव्हा आयत्या वेळी एखाद्या घरी जेवावे लागे, तेव्हा तेव्हा पिठलेच असायचे! गृहिणींच्या दृष्टीने सहजगत्या करता येण्याजोगा आणि जास्त पाहुणे असले तरी पुरवठ्याला येणारा असा तोच एक पदार्थ होता. आत्ताच्या प्रसंगाला ती पार्श्वभूमी होती. आता हा प्रकार पूर्वनियोजित होता का अगदी आयत्या वेळी ह्या ओळी शेखांना सुचल्या होत्या, कोण जाणे; पण नंतर कित्येक दिवस या प्रसंगाची आठवण निघाली, की मुलांची हसता हसता मुरकुंडी वळायची. दरम्यान रावसाहेबांचे पेटिट हायस्कूलमधले औपचारिक शिक्षण चालूच होते; अभ्यासात फारसे लक्ष नसले तरी ते नापासही कधी होत नव्हते. मॅट्रिकला असताना एकदा संगमनेरमध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे आणि त्यानंतर कॉलेजच्या प्रथम वर्षी फर्गसनमध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्यांना काही महिने पुण्याला काढावे लागले होते. त्यावेळी त्यांचा मुक्काम पुण्यातील पार्टीच्या कम्यूनमध्येच होता. त्यामुळे चळवळीतला सक्रिय सहभाग कमी झाला असला तरी सहकाऱ्यांबरोबरच संपर्क कायम राहिला होता. पुढे कोल्हापूरला राजाराम कॉलेजात प्रथम वर्षाचा उर्वरित भाग काढताना मात्र तो संपर्क फारसा राहिला नाही, कारण कोल्हापूरला कम्युनिस्ट पक्षाचे फारसे कार्यच नव्हते. किंबहुना पक्षकार्याचे आकर्षण हे द्वितीय वर्षासाठी अहमदनगर कॉलेजात प्रवेश घेण्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते. अहमदनगरला आल्यावर मात्र हिवाळेसरांपासून लपवून का होईना पण त्यांचे पक्षकार्य पुन्हा सुरू झाले. हा सगळा भाग मागील प्रकरणात आलेलाच आहे. आता त्यांचा जास्तीत जास्त सहभाग हा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेच्या कामात होता. स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकारने महाविद्यालयांची फी वाढवली होती व त्याविरुद्ध फेडरेशनने मोठे आंदोलन छेडले होते. त्यासाठी मुंबई येथे एक देशव्यापी परिषद भरवली होती. रावसाहेबांच्या दृष्टीने ती परिषद अनेकदृष्ट्या लक्षात राहावी अजुनी चालतोची वाट... १४४