पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे सगळे चालू असतानाच रावसाहेब संगमनेरला शिंदे बोर्डिंगही चालवत होतेच. कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते ह्या परिसरात दौऱ्यावर असले, की रात्रीच्या मुक्कामाला बोर्डिंगवर येत. बोर्डिंगमध्ये खूप सुखसोयी होत्या अशातला भाग नव्हता; छोट्या-मोठ्या सर्वांनाच विहिरीवर अंघोळ करावी लागे आणि जमिनीवर वळकटी अंथरावी लागे. पण तरुण विद्यार्थ्यांबरोबर राहणे त्यांना मनापासून आवडायचे. त्या निमित्ताने मग वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवर चर्चा व्हायच्या, बातम्यांची देवाणघेवाण व्हायची. विद्यार्थ्यांनाही या सगळ्यातून खूप काही मिळायचे. पण खरी मजा यायची ती किसान सभेचे कलापथक रात्रीच्या मुक्कामाला बोर्डिंगमध्ये यायचे तेव्हा. मुले मोकळ्या पटांगणात कलापथकाबरोबर कोंडाळे करून बसायची आणि कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात गप्पांचे फड रंगायचे. चुटके सांगणे, एकत्र गाणी म्हणणे, नकला, हास्यविनोद यांची नुसती धमाल उडायची. कसलेल्या शाहिरांसमोर आपले कलागुण दाखवता येणे ही मुलांच्याही दृष्टीने एक सुवर्णसंधी असायची. त्यांचे कार्यक्रम कुठे जवळपास असले तर मुलेही कलापथकाबरोबर जात; गाणी गाताना तेवढीच कोरसमध्येही भर पडायची. नगर जिल्ह्यात पक्षाचे काम बरेच होते व त्यामुळे अमर शेख आणि त्यांचे कलापथक वरचेवर नगरच्या दौऱ्यावर येत आणि संगमनेर व अकोले हे दोन तालुके म्हणजे जिल्ह्यातील चळवळीचा केंद्रबिंदूच होता. दोन-तीनदा तर सलग आठ आठ दिवस या कलापथकाने शिंदे बोर्डिंगमध्ये मुक्काम केला होता. मुलांशी त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. त्या काळी ग्रामीण भागात हॉटेल्स जवळपास नसायचीच; त्यामुळे गावातच कुठल्यातरी ओळखीच्या घरात किंवा कुठूनतरी ओळख काढून गेलेल्या घरात जेवण व कधीकधी रात्रीचा मुक्कामही करावा लागले; जे काही समोर येईल त्यात भागवून घ्यावे लागे. त्यासंदर्भात एक गमतीदार प्रसंग घडला होता. एकदा शिंदे बोर्डिंगमध्ये अमर शेखांचा व बरोबर कलापथकातील दहा-पंधरा जणांचा मुक्काम होता. बोर्डिंगमधल्या मुलांसह सगळे पटांगणात गोल करून रात्रीच्या जेवणाला बसले. आधी भाकऱ्या वाढल्या गेल्या आणि मग पाठोपाठच कोणीतरी पिठलेही वाढायला आणले. पिठल्याचे पातेले बघताच शेख उभे राहिले आणि आपल्या दमदार आवाजात त्यांनी गायला सुरुवात केली, 'नगर जिल्ह्यातुनी, भागाभागातुनी, लाल ताऱ्याची साथ... १४३