पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुळली. आपल्या आठ-दहा एकरांच्या छोट्याशा शेतात सतत राबणारे हे व्यक्तिमत्त्व. विचारांनी आणि वृत्तीनी अगदी स्वतंत्र. पटले नाही तर कोणाचेच ऐकायचे नाही. शरीराने दणकट. कोणी उपद्रव करणारा भेटला तर तिथल्या तिथे चार फटके लगावून त्याला सरळ करणार. शिक्षण फारसे नाही, पण वाचनाचा नाद लहानपणापासून. रोज वर्तमानपत्र वाचणार. भोवतालच्या जगात काय काय चालले आहे हे समजून घेण्याची इच्छा जबर. अनेक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना ते भूमिगत असताना यांनी आपुलकीने पण मोठी जोखीम पत्करून आसरा दिला. पुढे आयुष्यभर एक सच्चा कम्युनिस्ट म्हणून त्यांनी काम केले. करंजी परिषदेलाही त्यांची अर्थातच भरपूर मदत झाली. एकदा ऋणानुबंध जुळले ते कायमचेच. दादा पाटील राजळे आणि भानुदास पाटील चौधरी हे दोघेही पुढे आयुष्यभरासाठी रावसाहेबांचे स्नेही झाले. प्रत्यक्ष परिषदेच्या दिवशी करंजी गाव उत्साहाने ओसंडून जात होते. अण्णाभाऊ आणि आठरे पाटील यांनी परिषदेची उत्तम आखणी केली होती. परिषदेचे अध्यक्ष म्हणून कॉ. बंकिम मुखर्जी या बंगालमधल्या सुप्रसिद्ध शेतकरी नेत्यांना आमंत्रित केले होते. मुखर्जी यांना मराठी अजिबातच येत नव्हते; पण त्यांच्याशेजारी बसून अण्णासाहेब सर्व भाषणांचा इंग्रजी अनुवाद त्यांना ऐकवत होते. परक्या मुलुखातील व्यक्तीला अध्यक्ष म्हणून आमंत्रित करणे आणि विशेष म्हणजे सर्व कामकाज त्यांना कळावे म्हणून तडकाफडकी केलेला इंग्रजीतला अनुवाद त्यांना ऐकवणे हे खूप दुर्मिळ होते. अनुवादाचे कामही एखाद्या कार्यकर्त्यावर न सोपवता स्वतः मुख्य आयोजकांनी ते करणे हेही खूप विशेष होते; आयोजकांचा विशाल दृष्टिकोन आणि पाहुण्यांविषयीची संवेदनक्षमता या दोन्ही गोष्टी यात दिसत होत्या. सकाळी प्रतिनिधिसभा होती व त्यात विषय नियामक समितीचे कामकाज झाले. दुपारी खुले होते. त्यासाठी समोर वीस-पंचवीस हजार शेतक जमले होते. इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणे हेच परिषदेचे खूप मोठे यश होते. या परिषदेचे एक वेगळेपण म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणातला सहभाग ; त्या काळात महिला अशा कार्यक्रमांना सहसा कधी जात नसत. गावोगावी घेतलेल्या प्रचारसभा सार्थकी लागल्या होत्या. रात्री गावालगतच्या एका मोठ्या मोकळ्या शेतात कलापथकाचा कार्यक्रम झाला व त्यालाही नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाला खुल्या अधिवेशनापेक्षाही अधिक गर्दी जमली होती. त्यानंतर करंजी किसान परिषदेची अधिकृत सांगता झाली. परिषदेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघून नगर जिल्हा आता लाल झाला आहे, या चर्चेला जोर आला. अजुनी चालतोची वाट... १४२