पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काँग्रेसवाल्यांनी सपाटून मार खाल्ला. पाच-दहा काँग्रेसवाले कम्युनिस्टांच्या गराड्यात सापडले. आगळीक काँग्रेसवाल्यांनीच काढली होती. कम्युनिस्टांना संताप अनावर झाला होता. एवढ्यात अमर शेख गर्दीत घुसले. आपल्या लांबलचक हातांनी त्यांनी दोघातिघांच्या मुस्कटात दिल्या. काही काँग्रेसवाल्यांच्या हातात मारामारीसाठी बरोबर आणलेली सायकलचेन होती; आता लटपटायला लागल्यावर ती गळून खाली पडली. "हरामजादे साले!" असे म्हणत शेख त्यांना हाणू लागले. त्यांचा एकूण अवतार समोरच्याला धडकी बसेल असाच होता. डोक्यावरचे लांबसडक व दाट केस आता पुरते विस्कटले होते. शेवटी एकेक करत सगळे काँग्रेसवाले जिवाच्या आकांताने पळाले. त्या विजयोन्मादातच राजूर परिषद पार पडली. त्यानंतर करंजी येथील शेतकरी परिषद झाली. अण्णाभाऊंच्या नेतृत्वाखाली राबवला गेलेला हा त्या काळातला दुसरा उपक्रम. या खेपेला अण्णाभाऊंबरोबर चंद्रभान आठरे पाटील यांचाही मोठा सहभाग होता. करंजी गाव नगरच्या पाथर्डी तालुक्यात आहे. पाथर्डी, शेवगाव व नेवासा अशा एकूण तीन तालुक्यांतील शंभर खेड्यांमध्ये प्रचारसभा घेण्याचे काम आयोजकांनी रावसाहेब व धर्मा पोखरकर यांच्यावर सोपवले होते. त्यांच्या मदतीला काही ठिकाणी पी. बी. कडू पाटील आणि आबासाहेब लगड हेही असायचे. हा सगळा परिसर दोघांनाही पूर्ण नवखा होता व तिथे राहणारे फारसे कोणी पक्षाचे कार्यकर्तेही नव्हते. पण कुठलीच गोष्ट अशक्य मानायची नाही ही क्रांतिकारकांची जिद्द. रोज सकाळी दोन छोटया गावांमधल्या छोट्या सभा आणि संध्याकाळी एका मोठ्या गावातली मोठी सभा असा दिनक्रम त्यांनी आखला. संध्याकाळच्या सभांना गर्दी चांगली व्हायची, कारण आपले दिवसभरातले कामधाम उरकून मंडळी तेव्हा जरा मोकळी झालेली असत. पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव - कासार या गावच्या दादा पाटील राजळे यांच्याशी जुळली. त्यांचे वडील वारकरी पंथाचे एक व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. गावात खूप मान असलेले. तेथील सभेत धर्मांना विंचू चावला पण समयसूचकता दाखवून गावकऱ्यांनी सगळे निभावून नेले. दादा पाटील राजळे यांनी परिषदेसाठी तालुक्यातले बरेच शेतकरी आणले; शिवाय परिषदेला मदत म्हणून धान्याची काही पोतीही जमा करून आणली. त्यांनीच पुढे असंख्य अडचणींवर मात करून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला, उत्तम चालवला. शाळा, कॉलेज व शेतकी कॉलेज काढले. त्यांना औपचारिक शालेय शिक्षण फारसे मिळाले नव्हते पण आपल्या उपजत व्यवहारज्ञानाच्या व त्यागी वृत्तीच्या बळावर सगळ्या तालुक्याचा त्यांनी कायापालटच करून दाखवला. नेवासा तालुक्यात भानुदास पाटील चौधरी यांच्याशी रावसाहेबांची मैत्री लाल ताऱ्याची साथ... १४१