पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कॉम्रेडरीची साक्ष पटवणारे होते आणि रावसाहेबांच्या तरुण मनाला ते खूप सुखावून गेले. कम्युनिस्ट पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा या कॉम्रेडरीमुळे अधिकच पक्की झाली. या सुमारास अण्णाभाऊही पुन्हा नेतृत्व देऊ लागले होते. १९४४मध्ये तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी बाहेरूनच लॉचा अभ्यास सुरू केला होता, १९४५ मध्ये पुण्याच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएल.बी. ची परीक्षा दिली व १९४६ मध्ये त्यांनी वकील म्हणून सनद घेतली. अनुभव मिळावा म्हणून अहमदनगरमध्ये प्रख्यात वकील भाऊसाहेब कानवडे यांच्याकडे उमेदवारी सुरू केली व त्याचवेळी नगरमधल्या कम्युनिस्ट कार्यातही ते लक्ष घालू लागले. त्यांच्या पुढाकारातून १९४६ सालात पक्षाचे दोन उपक्रम राबवले गेले. त्यातला पहिला होता राजूर येथील शेतकरी परिषद. राजूर हे अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील बाजाराचे गाव. आसपास आदिवासींची मोठी वस्ती. सावकारीचाही मोठा व्यवसाय तेथे होता. हे सर्व सावकार काँग्रेसच्या बाजूचे आणि कट्टर कम्युनिस्टविरोधी. त्यांनी अकोले, संगमनेर इथून त्यांचे बरेच कार्यकर्ते जमवले. परिषद उधळून लावण्याचा त्यांनी कट रचला. कटाची कुणकुण अण्णाभाऊंना लागली होती. परिषदेसाठी त्यांनी प्रभाकर बर्डे व आर. जी. कऱ्हाडकर या ज्येष्ठ पक्षनेत्यांना बोलावले होते. दोघेही फर्या नेतृत्वाबद्दल व लढाऊ बाण्याबद्दल प्रसिद्ध होते. अमर शेख यांचे कलापथकही हजर होते. परिषद सुरू होण्यापूर्वी वातावरणनिर्मितीसाठी म्हणून गावातून मिरवणूक काढली गेली. नेते एका भाड्याने घेतलेल्या मोटारीत होते व पुढे-मागे घोषणा देत कम्युनिस्ट कार्यकर्ते पायी चालले होते. मिरवणूक परिषदेच्या ठिकाणी पोचेस्तोवर तापले होते. विरोधकांचा मोटार पेटवून देण्याचा बेत असल्याचे कानावर आले होते. जरा वेळाने दबा धरून बसलेले काँग्रेसवाल्यांचे एक दीड- दोनशे जणांचे मोठे टोळके "पेटवा, पेटवा, गाडी पेटवा" असे म्हणत मोटारीच्या दिशेने पुढे सरसावले. रावसाहेब आणि त्यांचे तरुण सहकारी काहीसे गडबडले. पण कऱ्हाडकरांचे प्रसंगावधान दांडगे होते. झटक्यासरशी त्यांनी गाडीतून बाहेर उडी घेतली, एका कार्यकर्त्याकडची झेंड्याची काठी आपल्या हाती घेतली आणि "Offence is the best form of defence" असे म्हणत ते काँग्रेसवाल्यांच्या मागे धावले. काँग्रेसवाल्यांना त्यांचा हा रुद्रावतार अगदीच अनपेक्षित होता; त्यांना पळता भुई थोडी झाली. कऱ्हाडकर काठीने सपासप प्रहार करतच राहिले. इतरही तरुण सहकारी आता त्यांच्यासोबत काँग्रेसवाल्यांचा पाठलाग करू लागले. वातावरण अजुनी चालतोची वाट... १४०